Pune News: पुणे पोलिसांसाठी मोठी घोषणा: शहराला मिळणार 5 नवीन पोलीस स्टेशन आणि 1000 अतिरिक्त पोलीस बळ

पोलीस दलाच्या भविष्यासाठी आपण 60 वर्षानंतर एक नवीन आराखडा तयार केला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आधुनिक पोलिसिंगसाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व या आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराच्या सुरक्षेसाठी आणि पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी एक मोठी घोषणा केली आहे. पुण्यामध्ये 5 नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यात येतील आणि त्यासाठी किमान 1000 पोलिसांचे अतिरिक्त बळ पुरवण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच, पुण्याला 2 नवीन पोलीस उपायुक्त देण्याची मागणीही लवकरच मान्य केली जाईल, असे संकेत त्यांनी दिले.

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज मला आनंद होत आहे की बरोबर 10 वर्षांपूर्वी आपण CCTV फेज 1 चं उद्घाटन केलं होतं. पुणे शहर ज्या वेगाने विस्तारत आहे. त्यानुसार आपण त्यात सातत्याने भर घालत गेलो आहोत. आज पुणे शहर पोलिसांकडे देशभरातील सर्वात अत्याधुनिक CCTV प्रणाली आहेत. ज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI) जोड देण्यात आली आहे. या प्रणालीमुळे एखादा गुन्हेगार गुन्हा करून पसार झाला, तर 1 मिनिटात हजारो CCTV स्कॅन करून त्याला पकडणे शक्य आहे. 'बचके रहना रे बाबा' हे जुनं गाणं आता पुणे पोलिसांमुळे सत्यात उतरलं आहे, असेही ते म्हणाले.

(नक्की वाचा- Ajit Pawar: पुण्यात आणखी 3 महानगरपालिका? DCM अजित पवारांची मोठी घोषणा)

CCTV च्या देखभालीबद्दल बोलताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला. अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, जर एखादा कॅमेरा बंद पडला तर तो लगेच सिस्टिमला मेसेज देतो. बंद पडलेले कॅमेरे 24 तासांच्या आत सुरू झाले पाहिजेत, अशा सूचना मेंटेनन्स करणाऱ्या टीमला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, त्यांनी पोलीस स्टेशनमधील अनाउंसमेंट सिस्टिमबद्दलही एक सूचना केली. ही सिस्टिम नेहमीच चालू राहावी, यासाठी रोज त्यावर महाराष्ट्र गीत आणि शिवाजी महाराजांचा एक पोवाडा लावण्याची कल्पना त्यांनी मांडली.

(Solapur Crime: गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण, हत्येचा प्रयत्न, राजकीय वर्तुळात खळबळ)

पोलीस दलाच्या भविष्यासाठी आपण 60 वर्षानंतर एक नवीन आराखडा तयार केला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आधुनिक पोलिसिंगसाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व या आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे. याच सर्व गोष्टींचा आढावा घेऊन पुणे पोलिसांची मागणी मान्य करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची 5 नवीन पोलीस स्टेशन आणि 2 नवीन DCP ची मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

Advertisement

Topics mentioned in this article