जाहिरात

Kabutarkhana : कबुतरखान्यासंबंधीच्या वादात जैन समाजाचा मोठा निर्णय!

Dadar Kabutarkhana News :  मुंबईतील कबूतरखान्यावरून सुरु झालेल्या वादानंतर जैन समाजाकडून उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे

Kabutarkhana : कबुतरखान्यासंबंधीच्या वादात जैन समाजाचा मोठा निर्णय!
मुंबई:

विशाल पुजारी, प्रतिनिधी 

Dadar Kabutarkhana News :  मुंबईतील कबूतरखान्यावरून सुरु झालेल्या वादानंतर जैन समाजाकडून उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे. या प्रकरणात 13 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयत सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पार पडल्यानंतर जैन समाजातील विविध संघटना, पदाधिकारी एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत कबूतर खाण्यासंदर्भात सुरू असलेल्या  विषयावर चर्चा होईल. या बैठकीनंतरच अधिकृतपणे जैन समाज त्यांची भूमिका मांडणार आहे.

कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणे टाकणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश कायम ठेवतानाच हायकोर्टाने तज्ज्ञांची समिती नेमण्याचे आदेशही दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑगस्ट रोजी होणार आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे पालिका आणि राज्य सरकार दोन्हींचे कर्तव्य आहे, असंही हायकोर्टानं सांगितलंय. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत मुंबईतील कबुतरखाने बंदच राहतील हे स्पष्ट झाले आहे. आता उच्च न्यायालयाच्या सुनावणी मध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र जैन समाजाने बैठक घेऊन यावर तोडगा काढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.  जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी याबाबत माहिती दिली. 

( नक्की वाचा : Dadar kabutar Khana: ना पक्ष ना नेता ना झेंडा! आता मराठी माणूस दाखवणार आपली ताकद )
 

ललित गांधी यांनी याबाबत माहिती देत असताना सांगितलं की, दादर कबूतर खाण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रीट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाद्वारे फेटाळण्यात आली असून, मुंबई उच्च न्यायालयाकडे अंतरिम आदेशात दुरुस्ती करण्याचा अधिकार याचिकाकर्त्यांकडे कायम ठेवला आहे. त्यामुळे कबूतरखान्यासंबंधी जो काही निर्णय व्हायचा असेल तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल अशी माहिती जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. 

न्यायालयामध्ये याचिकाकर्त्यांनी जी काही भूमिका घेतली असेल त्यानंतर न्यायालयाचा जो निर्णय होईल त्या निर्णयाची समीक्षा करून पुढील भूमिका ही एकत्रितपणे ठरवली जावी यासाठी 13 ऑगस्ट 2025 रोजी जैन समाजाची उच्चस्तरीय बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. जैन समाजाच्या या उच्चस्तरीय बैठकीमध्ये प्रमुख जैन आचार्यांचे मार्गदर्शनही घेतले जाईल. 

त्यामुळे सदर बैठकीपूर्वी जैन समाजातल्या विविध संबंधित पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी,अन्य समाजातील जीवदया प्रेमींनी तसेच साधू संतांनी सुद्धा माध्यमावर प्रतिक्रिया देऊ नयेत, तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अनादर होईल अशा प्रकारचे कृत्य करू नये असे आवाहनही ललित गांधी यांनी केले आहे. 

समाज म्हणून एकत्रित भूमिका ठरवल्यानंतरच सर्वांनी त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने सर्व समाज बांधवांनी आणि जीवदया प्रेमींनी न्यायालयीन आदेश व त्यानंतरची समाजाची बैठक या निर्णयापर्यंत संयम बाळगावा असे आवाहन ललित गांधी यांनी केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com