
गुजरातमध्ये जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना (JITO) या समुदायाच्या संस्थेने केलेल्या एका अभूतपूर्व कराराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. JITO च्या सदस्यांनी एकत्र येऊन लक्झरी कार उत्पादकांकडून तब्बल 21 कोटींची मोठी सूट मिळवत एकूण 186 महागड्या गाड्यांची खरेदी केली आहे. या गाड्यांची किंमत प्रत्येकी 60 लाख ते 1.3 कोटी दरम्यान आहे.
JITO चे उपाध्यक्ष हिमांशु शाह यांनी या माहितीची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, बीएमडब्ल्यू (BMW), ऑडी (Audi) आणि मर्सिडीज (Mercedes) सारख्या लक्झरी कार ब्रँड्ससोबत हा अनोखा करार JITO ने केला. JITO ही एक नॉन प्रॉफिट संस्था असून, तिचे संपूर्ण भारतात 65,000 हून अधिक सदस्य आहेत.
(नक्की वाचा - Zepto Delivery Boy Earning : झेप्टो डिलिव्हरी बॉय एका आठवड्यात किती कमावतो? आकडा पाहून चकीत व्हाल!)
मोठी सवलत कशी मिळाली?
या उपक्रमाचे सूत्रधार नितिन जैन यांनी सांगितले की, कार उत्पादकांकडून मोठी सूट मिळवण्याची कल्पना काही सदस्यांनी सुचवली होती. त्यामुळे संघटनेने थेट मोठ्या ब्रँड्सशी संपर्क साधून सदस्यांसाठी मोठी सूट मिळवली. कार उत्पादकांनाही हा सौदा फायदेशीर वाटला, कारण यामुळे त्यांची मार्केटिंग किंमत कमी झाली आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विक्री झाली. JITO केवळ एक सुविधा पुरवणारी संस्था होती आणि त्यांना या सौद्यातून कोणताही लाभ मिळाला नाही, असे शाह यांनी स्पष्ट केले.
प्रत्येकी 8 लाख ते 17 लाखांची बचत
जानेवारी ते जून या काळात 186 लक्झरी गाड्या देशभरातील त्यांच्या मालकांना सुपूर्द करण्यात आल्या. यापैकी बहुतेक गाड्यांची खरेदी गुजरातच्या जैन समुदायाच्या लोकांनी केली आहे. या राष्ट्रव्यापी अभियानामुळे सदस्यांना 21 कोटींची बचत झाली आहे. नितिन जैन यांनी सांगितले की, प्रत्येक सदस्याने सरासरी 8 लाख ते 17 लाख रुपयांपर्यंतची बचत केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world