मीठी नदी साफसफाईच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया यांची मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दाखल केलेल्या खटल्याच्या संदर्भात मोरिया यांची चौकशी केली. मुंबईतून वाहणाऱ्या मीठी नदीच्या स्वच्छतेसाठी एक करार करण्यात आला होता. त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डिनो मोरियाचं नाव कसं आलं समोर?
सूत्रांनुसार, तपासादरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी केतन कदम आणि सहआरोपी जय जोशी यांच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी केली. तेव्हा डिनो मोरिया यांचं नाव समोर आलं. या रेकॉर्ड्समधून पोलिसांना कळलं की, डिनो आणि त्यांच्या भावाने केतन कदम यांच्याशी अनेक वेळा फोनवर संपर्क साधला होता. केतन कदमला या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस डिनो मोरिया यांच्याशी संबंधित व्यक्तींशी चौकशी करत आहेत. तसंच त्यांना या कराराबद्दल काही माहिती होती का, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Rain : नागरिकांनो घरातच थांबा, मुंबईसह 'या' 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट
काय आहे मीठी नदी घोटाळा?
या प्रकरणात 65 कोटी रुपयांची अनियमितता आहे. तसा आरोपही केला गेला आहे. आरोपानुसार, मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, केरळमधील एका कंपनीने, आणि गाळ काढण्याचे मशिन भाड्याने देणाऱ्या केतन कदम व जय जोशी यांनी मीठी नदीतून गाळ काढण्याच्या करारासाठी हात मिळवणी केली. त्यातून या सर्वांनी मिळून भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय त्याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
घोटाळ्याची पद्धत
या प्रकरणात आरोप आहे की, बीएमसी अधिकाऱ्यांच्या एका पथकाने केरळमधील मॅटप्रॉप (Mattprop) कंपनीच्या प्लांटला भेट दिली. जी गाळ काढण्याच्या आणि ड्रेजिंग मशीन्समध्ये महत्वाचं काम करते. त्यानंतर, बीएमसीने मॅटप्रॉपच्या मशीन्सशी तंतोतंत जुळणाऱ्या विशिष्ट मागण्यांसह टेंडर काढले. याचा अर्थ असा होता की, टेंडरसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही कंत्राटदाराला या मशीन्स केरळच्या कंपनीकडूनच विकत घ्याव्या लागतील किंवा भाड्याने घ्याव्या लागतील. हा त्या मागचा आरोप होता.
तपासात असं समोर आलं आहे की, जेव्हा बीएमसीचे अधिकारी मशीन्स खरेदी करण्यासाठी मॅटप्रॉपकडे गेले, तेव्हा त्यांना 'दलाल' केतन कदम आणि जय जोशी यांच्याकडे पाठवण्यात आलं. ते अशा मशीन्स भाड्याने देतात. त्यांनी सुरुवातीला गाळ ढकलणाऱ्या मशीन्स आणि पॉन्टून (pontoon) मशीन्स दोन वर्षांच्या करारासाठी भाड्याने देण्यासाठी 8 कोटी रुपये मागितले. शेवटी, 4 कोटी रुपयांवर सहमती झाली. बीएमसी अधिकारी, मॅटप्रॉपचे प्रतिनिधी आणि कदम व जोशी यांनी मिळून गाळ काढण्याचा दरही वाढवला. सामान्य दर 1,609 रुपये प्रति मेट्रिक टन होता, जो या मशीन्ससाठी वाढवून 2,193 रुपये प्रति मेट्रिक टन करण्यात आला. जेव्हा बीएमसीच्या दक्षता विभागाने आक्षेप घेतला, तेव्हा पूर्वीचा दर मंजूर करण्यात आला.
तपासात असंही आढळून आलं आहे की, अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना 17 कोटी रुपये दिले आणि कंत्राटदारांनी मुंबईतून गाळ वाहतूक करण्यासाठी बनावट बिलेही तयार केली. या प्रकरणात एकूण 13 जणांना आरोपी बनवण्यात आलं आहे. यात मॅटप्रॉपचे दीपक मोहन आणि किशोर मेनन यांचा समावेश आहे. पण, आतापर्यंत फक्त केतन कदम आणि जय जोशी यांनाच अटक करण्यात आली आहे. पोलीस अजूनही डिनो मोरिया यांच्या संबंधांची आणि या प्रकरणात त्यांच्या माहितीची चौकशी करत आहेत.