Best Election Result: राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेंच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधुंना दारूण पराभव सहन करावा लागला आहे. या निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी मतदान झाले होते, ज्यापैकी एकाही जागेवर ठाकरे बंधूंच्या पॅनेलला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेआधी ठाकरे बंधुंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
बेस्ट पतपेढी निवडणुकीत प्रसाद लाड यांच्या श्रमिक पॅनेलचे 7 उमेदवार विजयी झाले तर शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येत 'उत्कर्ष पॅनेल'ची स्थापना केली होती. मात्र या पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे बंधुंवर निशाणा साधला आहे.
भाजप नेते प्रसाद लाड यांनी निकालानंतर ट्वीट करून आपला आनंद व्यक्त केला. "जागा दाखवली…. बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँड २१ समोर ०००... म्हणजे ठाकरे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत", असं ट्वीट प्रसाद लाड यांनी केलं आहे.
(नक्की वाचा- BEST Election Result : ठाकरेंची ब्रँड फेल! बेस्ट निवडणुकीत मनसे-ठाकरे गटाच्या पॅनलचा धुव्वा)
"संजू भौ जवाब दो!"
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी देखील ट्वीट करत म्हटलं की, "संजू भौ जवाब दो! बेस्ट पतपेढी निवडणुकीत उबाठा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा दारूण पराभव झाला. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईकरांनी आपला कौल स्पष्टपणे दिला आहे. उबाठाचा एकही उमेदवार निवडून आला नाही."
"ही निवडणूक EVMवर नाही तर बॅलेट पेपरवर झाली. म्हणजे नेहमीप्रमाणे “EVM, मतचोरी, षड्यंत्र” असं खोटं रडगाणं गाण्याचा अधिकार आता संजय राऊतांना नाही. रोज माध्यमांसमोर येऊन लोकशाहीवर डोंगराएवढी भाषणं करणारे संजय राऊत आज मुंबईकरांच्या या लोकशाहीच्या निर्णयावर शिमगा करणार की तोंडात बोटं घालून बसणार? जवाब दो!" असा टोला नवनाथ बन यांनी लगावला आहे.
(नक्की वाचा- Kamva Ani Shika: महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मिळणार महिन्याला 2,000 रुपये; काय आहे सरकारची योजना?)
"‘दोन शून्यां'ची बेरीज केली"
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील ठाकरे बंधुंवर निशाणा साधत म्हटलं की, "एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां'ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते. हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी'च्या निवडणूक निकालाकडे पाहा! कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे!!"