विनय म्हात्रे, नवी मुंबई
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत प्रस्थापितांना संधी मिळाली आहे. जास्तीत जास्त विद्यमान आमदारांना भाजपने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र पहिली यादी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(नक्की वाचा- BJP First List : भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये काय? 99 उमेदवार कोण? वाचा सविस्तर)
नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये भाजपने गणेश नाईक यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र नाईक कुटुंब ऐरोली आणि बेलापूर या दोन मतदारसंघातून इच्छुक होते. त्यामुळे भाजपची पहिली यादी झाल्यानंतर नवी मुंबईत संदीप नाईक बंडाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
संदीप नाईक बेलापूरमधून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संदीप नाईकांसाठी त्यांच्या मर्जीतले 20 नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय. संदीप नाईकांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज गटाची बैठक झाल्याची माहिती देखील आहे.
(नक्की वाचा- BJP First List : मराठवाड्यात भाजपचे 16 उमेदवार घोषित, एक जागा मात्र वेटिंगवर)
नाईक कुटुंब नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र भाजपने एका घरात दोन तिकीट देणे टाळत केवळ गणेश नाईक यांनाच उमेदवारी जाहीर केली. तर बेलापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नाराज संदीप नाईक बंडखोरी करु शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.