मुख्यमंत्री कोण आणि शपथविधी कधी? रावसाहेब दानवे यांनी सांगितला महायुती सरकारचा प्लान

शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं की, येत्या काही दिवसांत नवे सरकार स्थापन होईल. उद्या भाजपची गटनेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महायुतीच्या तीनही पक्षांच्या प्रमुखांची बैठक होईल

जाहिरात
Read Time: 2 mins

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. सरकार स्थापनेच्या दृष्टीने महायुतीने हालचाली देखील सुरु केल्या आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला आहे. मात्र पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधी कधी होणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा उत्सुक आहेत. मात्र सद्यस्थितीला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्रिपद आणि शपथविधीबद्दल विचारलं असता त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्रिपद आणि शपथविधीचं घोडं कुठेही अडलेले नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढले आहेत. 

(नक्की वाचा-  मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांच्या खेळीने शिंदे बॅकफूटवर)

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा गटनेता निवडला गेला. लवकरच भाजपचा गटनेता निवडला जाईल. यानंतर तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून पक्षश्रेष्ठींकडे आमदारांचे म्हणणे मांडतील , ते देतील तो निर्णय मान्य असेल. जोपर्यंत सगळेजण एकत्र बसून चर्चा करत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी एकट्याची नाही, यावर सामूहिक चर्चा होईल. 30 नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदासाठीचे नाव  निश्चित होईल आणि डिसेंबरमध्ये शपथविधी होईल, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. 

वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य असेल-  केसरकर

शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं की, येत्या काही दिवसांत नवे सरकार स्थापन होईल. उद्या भाजपची गटनेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महायुतीच्या तीनही पक्षांच्या प्रमुखांची बैठक होईल. त्यानंतर पक्षश्रेष्ठी यासंदर्भात निर्णय घेतील. प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. 

Advertisement

(नक्की वाचा-  'ट्रम्पेट'चा गोंधळ कायम, निवडणूक चिन्हातील साधर्म्यामुळे शरद पवारांचे 7 आमदार पराभूत)

मात्र तीनही पक्षांनी स्पष्टपणे सांगितलंय की जो निर्णय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेतील तो आम्हाला मान्य असेल. बोलावले जाईल तेव्हा तिघेही दिल्लीला जातील. तिघा नेत्यांचे एकमत आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने आम्ही काम करू. एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की जो आपण निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असे त्यांनी वरिष्ठांना सांगितले आहे, असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं.