महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने किती गांभीर्याने घेतलंय, याचे चांगले उदाहरण सध्या नागपुरात पाहायला मिळत आहे. भाजपच्या अलीकडच्या इतिहासात प्रथमच दुसऱ्या राज्यातील एखादा प्रभारी नेमून त्यांच्या उपस्थितीत शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ निहाय समीक्षा बैठका घेण्यात येत आहेत. भाजपचे माजी सरचिटणीस खास या बैठकांसाठी नागपुरात आले होते. दक्षिण पश्चिम नागपूर हा मतदारसंघ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघातही या माजी सरचिटणीसाच्या उपस्थिती बैठक पार पडली. या बैठकीला फडणवीसही उपस्थित होते. या बैठका नेमक्या कशासाठी होत आहेत, याचा आम्ही कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.
भारतीय जनता पक्षाचे माजी सरचिटणीस, पश्चिम बंगालचे माजी प्रभारी आणि मध्य प्रदेश सरकारचे विद्यमान मंत्री कैलाश विजयवर्गीय नागपुरात दोन दिवसांपासून ठाण मांडून होते. त्यांना भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून नागपूर शहर आणि जिल्ह्याचे प्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या नागपुरातील मंडळ स्तरावरील समीक्षा बैठकी सुरू आहेत. या बैठकांचे प्रारूप असे की आधी कोअर ग्रुपच्या पंचवीस तीस महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाते आणि त्यानंतर मंडळ स्तरावरील शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख अशा सुमारे शे दोनशे महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाते.
नक्की वाचा - शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी!
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने काही अंतर्गत सर्व्हे केले आहेत. या सर्वेंचे अहवाल पक्षाला प्राप्त झाले आहेत. या सर्व्हेनुसार भाजपसाठी विदर्भातील वातावरण फार उत्साहवर्धक दिसत नाहीये. नागपूरमध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सहा पैकी चार जागा टिकवण्यात यश मिळवलं होतं. पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूर अशा या चार जागा असून किमान या जागा आपल्या हातून निसटू नये यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केलेत. कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठका हा याचाच एक भाग आहे.
नक्की वाचा - अबकी बार सव्वाशे पार! विधानसभा निवडणुकीत 125 जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य
या बैठकांना माध्यमांना प्रवेश देण्यात आलेला नाही आणि प्रवक्त्यांनाही या बैठकीबाबत किंवा बैठकीत झालेल्या चर्चेबाबत बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र काही कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली असता असे कळाले की भाजपसाठी विधानसभेची प्रत्येक जागा आणि मत महत्वाचे आहे.एका कार्यकर्त्याने सांगितले की पक्ष नेतृत्वाने या समीक्षा बैठका घेण्यापेक्षा एकेका आमदाराच्या कार्यालयात सामान्य कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांची गाऱ्हाणी, तक्रारी ऐकून घ्यायला कोणी तयार असतं का ते पाहायला हवं. साधे चहा सोडा, पाणी सुद्धा कोणी विचारतं का ते पाहायला हवं. त्यावरूनच पक्षनेतृत्वाला बऱ्यापैकी माहिती मिळू शकली असती.
.