जाहिरात

Mumbai Puranpoli Order : 3500 पेक्षा अधिक पुरणपोळ्या थेट घरपोच, सेलिब्रिटींसह मुंबईकरांकडून या महिलांचं कौतुक

Puranpoli Mahotsav 2025: या महिलांनी तयार केलेल्या पुरणपोळीने मुंबईकरांच्या गुढीपाडव्याला मिळाला अधिक गोडवा, घरपोच सेवेमुळे मुंबईकरांनी व्यक्त केले धन्यवाद

Mumbai Puranpoli Order : 3500 पेक्षा अधिक पुरणपोळ्या थेट घरपोच, सेलिब्रिटींसह मुंबईकरांकडून या महिलांचं कौतुक
Mumbi Puranpoli Mahotsav 2025: पुरणपोळी महोत्सवास मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद

Mumbai Puranpoli Order : मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर (Marathi New Year) अर्थात गुढीपाडव्यासाठी (Gudi Padwa 2025) बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थसहाय्यित महिला बचत गटांनी सुरू केलेल्या 'पुरणपोळी महोत्सव'ला मुंबईकरांनी प्रचंड मागणी नोंदवून प्रतिसाद दिला. गुढीपाडव्याच्या दिवशी 50 बचत गटांना मिळून साडेतीन हजारांपेक्षा अधिक पुरणपोळ्यांची ऑनलाइन मागणी पूर्ण केली. विशेष म्हणजे या सर्व पुरणपोळ्या (Puranpoli Order) घरपोच मिळाल्याने मुंबईकरांनी बचत गटांच्या या सेवेचे कौतुक केले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रसिद्ध गायिकेनंही ऑर्डर केल्या पुरणपोळ्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या 50 बचत गटांना एकत्र आणून गुढीपाडव्यासाठी 'पुरणपोळी महोत्सव' (Puranpoli Mahotsav) उपक्रम राबवण्यात आला. ज्यांना पुरणपोळी हवी होती त्यांच्यासाठी https://shgeshop.com या वेबसाइटवर मागणी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली होती. संकेतस्थळावर मागणी नोंदवल्यानंतर आपल्या जवळच्या चार किलोमीटर परिसरातील महिला बचत गटाकडे याची नोंद होत होती. त्यानंतर मागणी नोंदवलेल्या मुंबईतील ग्राहकांना गुढीपाडव्याच्या दिवशी (30 मार्च 2025) रोजी पुरणपोळी घरपोच उपलब्ध करून देण्यात आली. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी देखील या ऑनलाइन पुरणपोळी महोत्सवात मागणी नोंदवली होती. 

(नक्की वाचा: Gudi Padwa 2025: गुढीपाडवा का साजरा करतात? गुढीचा अर्थ आणि महत्त्व काय, जाणून घ्या सविस्तर)

महिलांचे आर्थिक सशक्तीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका महिलांना वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. त्यामुळे बचत गटांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो. त्याचाच एक भाग म्हणून यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विविध बचत गटांना पुरणपोळी महोत्सवात सहभागी करून घेण्यात आले. या उपक्रमाला मुंबईकरांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे या सर्व बचत गटांचा हुरूप अधिक वाढला आहे.

नियोजन विभागाचे व्यावसायिक 'प्लॅनिंग'

पुरणपोळी महोत्सवातील 50 बचत गटांनी एसएचजी ई शॉप (shgeshop) या संकेतस्थळाद्वारे खवय्यांसाठी घरपोच पुरणपोळी पुरवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने या उपक्रमासाठी पूर्वतयारी केली होती. संबंधित बचत गटातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले होते. आपल्याकडे आलेली मागणी कशा पद्धतीने नोंद करून ठेवायची, त्यानंतर दर्जा आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळून स्वादिष्ट पुरणपोळी ग्राहकाला कशी घरपोच पाठवायची, याबाबतही नियोजन विभागाने बचत गटातील महिलांना नि:शुल्क मार्गदर्शन केले. आपल्या उत्पादनांना बाजारपेठ कशी उपलब्ध मिळू शकते, बाजारात मागणी असल्यास त्या पद्धतीने पुरवठा कसा करावा, याचेही प्रशिक्षण बचत गटांना देण्यात आले होते. 

एसएचजी ई शॉप (shgeshop) या संकेतस्थळावर मुंबईतील बचत गटांनी तयार केलेले असंख्य पदार्थ, वस्तू उपलब्ध असून मुंबईकरांनी त्या आवर्जून खरेदी कराव्या, असे आवाहन संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.