BMC Mayor 2026 BJP Candidate : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांचं लक्ष महापौर कोण होणार? याकडं लागलं आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने ठाकरे गटाचा आणि मनसेचा पराभव करत मुंबईवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भाजपचे 89 आणि शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आल्यामुळे या युतीकडे स्पष्ट बहुमत आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपचाच महापौर होणार हे आता निश्चित झाले आहे.मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनीही तसे संकेत दिले आहेत.
मात्र, या सर्व घडामोडीत एक ऐतिहासिक तथ्य अनेकांच्या विस्मरणात गेले आहे. मुंबईत भाजपचा पहिल्यांदाच महापौर होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली असली तरी, तांत्रिकदृष्ट्या हे सत्य नाही. भाजपचा महापौर होण्याची ही पहिली नाही, तर दुसरी वेळ असणार आहे.
कोण होते भाजपाचे पहिले महापौर?
अनेकांना वाटते की मुंबईत आजवर कधीच भाजपचा महापौर नव्हता, पण इतिहासाची पाने उलटली तर वेगळेच चित्र समोर येते. 1982 साली डॉ. प्रभाकर संजीव पै हे मुंबई महापौर झाले होते. त्यावेळी राजकीय समीकरणे आजच्या तुलनेत खूप वेगळी होती. तेंव्हा जनता पक्षातून फुटून भाजपची नुकतीच स्थापना झाली होती. आज ज्याप्रमाणे भाजपचा मोठा विस्तार झाला आहे, तशी परिस्थिती 1980 च्या दशकात नव्हती. तरीही भाजपने त्या काळी मुंबईच्या राजकारणात आपली छाप सोडली होती.
( नक्की वाचा : TMC Election 2026 : ठाण्यात शिवसेनेचेच वर्चस्व; महापौरपदासाठी 'ही' नावं आघाडीवर, पाहा कुणाला देणार शिंदे बढती! )
1982 मध्ये जेव्हा 140 जागांसाठी महापालिकेची निवडणूक झाली, तेव्हा बहुमतासाठी 71 जागांची गरज होती. त्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, भाजप किंवा डाव्या पक्षांपैकी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते.
भाजप हा त्यावेळी नवा आणि लहान पक्ष होता, ज्याचे केवळ 19 नगरसेवक निवडून आले होते. त्या काळी महापौरपदाचा कार्यकाळ आजच्यासारखा 5 वर्षांचा नसून केवळ 1 वर्षांचा होता.
काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी शिवसेना, भाजप विचारसरणीचे नगरसेवक, अपक्ष आणि समाजवाद्यांनी मिळून एक मोठी आघाडी केली. या आघाडीने बहुमताचा आकडा गाठला आणि डॉ. प्रभाकर पै यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली. ते भाजपचे मुंबईतील पहिले महापौर ठरले.
कोण होते डॉ. प्रभाकर पै?
डॉ. प्रभाकर पै यांचा जन्म कर्नाटकातील बरकुर या छोट्या गावात झाला होता. व्यवसायाने डॉक्टर असलेले पै समाजसेवेच्या ओढीने मुंबईत आले. वांद्रे-खार परिसरात त्यांचा वैद्यकीय व्यवसाय खूप यशस्वी होता.
1968 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 1968 ते 1984 या काळात त्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिले आणि याच काळात 1982-83 मध्ये त्यांनी महापौरपद भूषवले. त्यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
( नक्की वाचा : KDMC Mayor : कल्याणमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, नगरसेवक 'नॉट रिचेबल' ठाकरेंच्या पक्षांची कोकण आयुक्तांकडं धाव! )
ज्येष्ठ पत्रकारांनी जागवल्या आठवणी
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी डॉ. पै यांच्याबद्दल एक महत्त्वाची आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की, डॉ. पै हे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत निष्ठावान नेते होते. त्या काळी महापौर कार्यालयात काम करणारे अधिकारी प्रकाश परांजपे यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, डॉ. पै महापौर असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका शिबिरात सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, महापौर पदावर असतानाही ते संघाचा गणवेश म्हणजेच अर्धी चड्डी घालून त्या शिबिराला उपस्थित राहिले होते. यावरून त्यांची पक्षाशी आणि विचारसरणीशी असलेली निष्ठा दिसून येते. त्यामुळे आता जेव्हा भाजपचा महापौर मुंबईत बसेल, तेव्हा तो ऐतिहासिकदृष्ट्या दुसरा महापौर ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world