
Manoj Jarange Patil Morcha : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक दाखल झाले आहेत. या सर्व आंदोलकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) विविध नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
मराठा आंदोलकांना मदत करण्याच्या दृष्टीने पालिकेने उचललेली पाऊले खालीलप्रमाणे आहेत:
स्वच्छतागृहांची व्यवस्था: आझाद मैदान परिसरातील 'पैसे द्या आणि वापरा' तत्वावरील सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांसाठी मोफत करण्यात आली आहेत. यासोबतच, आझाद मैदानात 29 शौचकूप असलेले शौचालय मोफत उपलब्ध करून दिले आहे. तसेच, महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी 10 शौचकूप असलेली 3 फिरती शौचालये (Mobile toilets) आणि मेट्रो साइटजवळ 12 पोर्टेबल शौचालये पुरवण्यात आली आहेत.
पाण्याची सोय: आंदोलनस्थळी पिण्याच्या पाण्यासाठी 6 टँकर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गरजेनुसार आणखी टँकर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे.
( नक्की वाचा : 'राजकीय पोळी भाजू नका, नाहीतर तोंड भाजेल'; जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले )
चिखल हटवून रस्ता दुरुस्त: पावसामुळे आझाद मैदानात चिखल झाला होता. आंदोलकांना त्रास होऊ नये म्हणून हा चिखल हटवून त्या जागी 2 ट्रक खडी टाकून रस्ता समतल करण्यात आला आहे.
वैद्यकीय मदत: आंदोलकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष (Medical Aid) उभारण्यात आला आहे. तसेच, गरज पडल्यास 108 क्रमांकाची रुग्णवाहिका (Ambulance) सेवाही उपलब्ध आहे.
कीटकनाशक फवारणी आणि स्वच्छता: पावसाळ्यातील स्थिती लक्षात घेऊन आझाद मैदान आणि आजूबाजूच्या परिसरात कीटकनाशक फवारणी (Fumigation) करण्यात आली आहे. यासोबतच, मैदानाची स्वच्छता राखण्यासाठी पुरेसे कर्मचारीही नेमण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world