जाहिरात

BMC Election Result 2026 : '3 निवडणुकांमध्ये कुणालाही जमलं नाही ते', मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विजयाचं गणित

BMC Election Result 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला आहे.

BMC Election Result 2026 :  '3 निवडणुकांमध्ये कुणालाही जमलं नाही ते',  मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विजयाचं गणित
BMC Election Result 2026 :  भाजपाच्या विजयावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे,
मुंबई:

BMC Election Result 2026 :  मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला आहे. गेल्या 3 निवडणुकांचा इतिहास पाहिला, तर कोणत्याही मोठ्या पक्षाला कधीही गाठता आला नाही, असा 89 जागांचा टप्पा यंदा भारतीय जनता पक्षाने पार केला आहे. कमी जागा लढवूनही मिळवलेले हे यश मुंबई भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दादर येथील भाजप कार्यालयात आयोजित जल्लोष मेळाव्यात बोलताना नेत्यांनी या विजयाचे विश्लेषण करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

मुंबई भाजपाची ऐतिहासिक कामगिरी

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या तीन निवडणुकांकडे नजर टाकली तर कोणत्याही एका पक्षाला 89 जागांचा आकडा पार करता आला नव्हता. भाजपने यंदा केवळ 135 जागा लढवून 89 जागांवर विजय मिळवला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी 227 जागा लढवून भाजपने 82 जागा मिळवल्या होत्या. 

मात्र, यंदा कमी जागा वाट्याला येऊनही पक्षाने आपली ताकद वाढवली आहे. या विजयामुळे भाजप हा मुंबईतील नंबर 1 चा पक्ष ठरला असून मुंबईकरांनी विकासाच्या अजेंड्याला साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.


( नक्की वाचा : BMC Election Result 2026: मुंबईच्या महापौरासाठी भाजप आता 'एकनाथ शिंदें'नाच धक्का देणार? ठाकरेंचे खळबळजनक भाकीत )

टीकाकारांना आकड्यांनिशी उत्तर

भाजपच्या या विजयावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, काही लोक या विजयाला मोठा मानत नाहीत, पण त्यांना गणित समजून घेण्याची गरज आहे. भाजपने लढवलेल्या जागांपैकी 45 टक्के मते मिळवली आहेत. दुसरीकडे, 

'शिवसेना उबाठा'नं  आपल्यापेक्षा 30 जागा जास्त लढवूनही त्यांना केवळ 27 टक्के मते मिळाली आहेत. जर काही जागा थोड्या फरकाने गमावल्या नसत्या, तर याच निवडणुकीत महायुतीने विजयाचे शतक पूर्ण केले असते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठी माणूस आणि विकासाचा अजेंडा

मुंबईतील मराठी माणूस ही आपली जहागीर आहे असे समजणाऱ्यांना या निकालाने आरसा दाखवला आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. मुंबईतील सर्व समाजाची मते भाजपला मिळाली असून मराठी माणूस विकासासाठी भाजपसोबत उभा राहिल्याचे या निकालातून समोर आले आहे. 

मुंबईतील भाजपाचा हा विजय सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी असून, हा विजय टीम भाजपचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे स्मरण करत, आज भाजपची ही वाटचाल पाहून त्यांना नक्कीच आनंद होत असेल, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या. 

( नक्की वाचा : Maharashta Election 2026 : राज ठाकरेंच्या पदरी 22 शून्य ! मनसेचा मोठा पराभव, मुंबईतही 'ठाकरे ब्रँड ' फेल )

मुंबई फर्स्ट आणि भविष्यातील संकल्प

विजयाचा हा आनंद आम्ही उन्मादात बदलू देणार नाही, तर तो सेवेसाठी वापरू, असा संकल्प भाजपने केला आहे. ज्या दिवशी महापालिकेत महायुतीचा महापौर बसेल, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मुंबईच्या विकासाचे काम सुरू होईल. मुंबईचा एकही मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही आणि ही मुंबई लिव्हेबल तसेच लव्हेबल बनवू, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला. 

निवडणुकीच्या मैदानात कोणीही शत्रू नसून केवळ वैचारिक विरोधक आहेत, त्यामुळे विकासाच्या अजेंड्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांना सोबत घेऊन मुंबईला अधिक वेगवान बनवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com