पुण्यापाठोपाठ मुंबईतील वरळीमध्ये (Worli Drunk and Drive Case) दारू पिऊन गाडी चालवत लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे प्रकरण घडले आहे. मुंबईमधील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकारांची गंभीर दखल घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते, चौक,वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कडक कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचनाही मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आली आहे.
विशेषत: रात्रीच्या वेळेस तसेच विकेंडच्या दिवशी तापासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर (Repeat offenders) कडक कारवाई करण्यात यावी. अशा हॅबिच्युअल वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशा आदेशवजा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्ज, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमीत तपासणी करावी. पब्ज, बार, रेस्टॉरंट चालू ठेवण्याच्या वेळा, ध्वनी प्रदुषण रोखण्याचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात. रात्री उशीरा चालू राहणारे बार, पब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
दारू पिऊन करुन वाहने चालविण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी. लोकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधीत प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world