मनोज सातवी, पालघर
नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. सुषमा गुप्ता या महिलेचे नाव सहा वेळा मतदारयादीत असून, प्रत्येकी वेगवेगळा EPIC क्रमांक असल्याची माहिती समोर आल्यानंतर ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगालाच थेट प्रश्न विचारले असून, या बोगस नावांची फिजिकल तपासणी करण्याची मागणी केली आहे.
'परप्रांतियांना मतदान वाढवण्याची चाल'
हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अनेक धक्कादायक दावे केले. ते म्हणाले, "फक्त सुषमा गुप्ताच्या सहा नावांबद्दल बोलत आहात. पण मतदारयादीत आणखीही अशीच बोगस नावे आहेत. पूजा सिंगचे नाव 63 वेळा, अभिषेक सिंगचे नाव 47 वेळा आणि सुनील यादवचे नाव 53 वेळा नोंदवले आहे." या नावांच्या तपासणी बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.
(नक्की वाचा- 79th Independence Day: जीएसटी ते जेट इंजिन... PM मोदींच्या लाल किल्ल्यावरून देशवासियांसाठी 8 मोठ्या घोषणा)
ठाकूर यांनी संतप्त होत म्हटले की, "पाटील, राऊत किंवा ठाकूर अशा मराठी लोकांची नावे दुप्पट का येत नाहीत? जे नागरिक रांगेत उभे राहून, धक्के खात नोंदणी अर्ज भरतात, त्यांची नावे यादीत येत नाहीत. पण हे लोक ऑनलाइन अर्ज करून कुठून येतात? ही सगळी बाहेरची आणि बोगस नावे भरली आहेत."
हितेंद्र ठाकूर यांच्या मते, हा परप्रांतीय मतदारांची संख्या वाढवून आपल्या पसंतीचे लोक निवडून आणण्याचा डाव आहे. ते म्हणाले की, "नालासोपारा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत तब्बल 75,000 मतदार वाढले."
( नक्की वाचा: 'दिवाळीत देशवासियांसाठी मोठं गिफ्ट', लाल किल्ल्यावरुन PM मोदींची ऐतिहासिक घोषणा! )
हितेंद्र ठाकूर पुढे म्हणाले, "मतदार यादीत नाव असलेली माणसे खरोखर तिथे आहेत का, याची फिजिकल तपासणी झाली पाहिजे. उद्याला जर सत्ताधाऱ्यांच्या पसंतीची लोक निवडून आणायची असतील तर निवडणुका तरी कशाला घेता? निवडणूक आयोगानेच ज्यांना नगरसेवक बनवायचे आहे, त्यांची नावे जाहीर करावीत. कशाला पाहिजे हा तमाशा? सगळे बोगस चालले आहे. निवडणूक आयोगाने यावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे."