मनोज सातवी, पालघर
कुत्र्याला वाचवताना कार नदीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. वसई पश्चिमेला सनसिटी - गास रोडवर एक भरधाव कार जात असताना रस्त्यात आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट नाल्यात कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कार नाल्यात पडल्याने स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून कारमधील चालकाला दरवाजाची काच तोडून बाहेर काढले.
(नक्की वाचा- Uttarakhand Bus Accident : बस नदीत कोसळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 10 बेपत्ता)
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत नाल्यातून कार बाहेर काढली. कार सनसिटी गास रोड वरील तुळजाभवानी माता मंदिराच्या पुढे रस्त्या लगत असलेला नाल्यामध्ये पडली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी बेल्ट रोपच्या साह्याने कार नाल्यातून बाहेर काढली आणि कारचा ताबा वाहन मालक संतोष सुभाष मुरकर यांना देण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.
(नक्की वाचा- Ratnagiri News: मोबाईल गेम जीवावर बेतला; तरुणाची गळफास घेत आत्महत्या)
संतोष मुरकर हे सनसिटी - गास रोडवरून जात असताना हलका पाऊस सुरु होता. त्याचवेळी अचानक रस्त्यात कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार नाल्यात कोसळली. विशेष म्हणजे या परिसरातील नाल्यांवर संरक्षक कठडे अपूर्ण किंवा नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.