निलेश वाघ, मालेगाव
माजी मंत्री डॉ. बळीराम हिरे यांचे पुत्र आणि भाजप नेते प्रसाद बळीराम हिरे यांच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एकलव्य आघाडीचे नेते किरण मगरे यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आणि बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
मालेगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून, याबाबत मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात प्रसाद हिरे यांच्यासह 3 ते 4 साथीदारांविरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
(नक्की वाचा - Political news: मोहम्मद अजहरुद्दीन मंत्री होणार? कसं होणार शक्य, काय आहे गणित?)
'बंदुकीचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ' केल्याचा आरोप
किरण मगरे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या एका मित्राला सोडण्यासाठी जात असताना प्रसाद हिरे आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना अडवले. गाडीतून खाली उतरवून, बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो गाडीला लावून फिरतो, तुला जास्त झाले का? असे म्हणत जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. प्रसाद हिरे यांनी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे मालेगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. वंचित बहुजन आघाडीने या घटनेचा निषेध केला असून, भाजप नेत्यांच्या अशा वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी मंत्री डॉ. बळीराम हिरे यांचे पुत्र असलेल्या प्रसाद हिरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे भाजपसाठीही ही बाब अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, पुढील चौकशी सुरू आहे.