चेन स्नॅचिंग आणि मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता नागपुरातील अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात आरोपीने चक्क पार्सल देण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या घरात प्रवेश केला आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अश्विनी मेश्राम यांच्या घरी ही घटना घडली. ज्यावेळी त्या घरात एकट्या होत्या, तेव्हा एक अनोळखी व्यक्ती पार्सल घेऊन आल्याचे सांगत त्यांच्या घरी पोहोचला. अश्विनी यांना वाटले की त्यांच्या मुलीने जेवणाचे पार्सल पाठवले असेल, म्हणून त्यांनी कोणताही संशय न घेता दरवाजा उघडला. त्या व्यक्तीने त्यांना एका कागदावर सही करण्यास सांगितले. अश्विनी सही करत असतानाच, अचानक त्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. या झटापटीत मंगळसूत्रातील 3 ग्रॅम सोन्याचा भाग आरोपीच्या हातात आला आणि तो घेऊन त्याने तात्काळ पळ काढला.
(नक्की वाचा- Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गावर खिळे कुणी ठोकले? MSRDC चं स्पष्टीकरण आलं समोर)
अश्विनी मेश्राम यांनी आरडाओरड केली, पण शेजारी येईपर्यंत चोरटा पळून गेला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे, त्यामुळे पोलिसांना आरोपीचा माग काढणे सोपे जाईल.
(नक्की वाचा- OBC आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची आत्महत्या, वेदनादायी सुसाईड नोटही सापडली)
अश्विनी यांच्या तक्रारीनंतर अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आता पोलिसांसमोर आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे आव्हान आहे.