Nashik Crime News : नाशिक शहरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. दिवसाढवळ्या चोर घरात घुसून कसे चोरी करतात, हे या व्हिडीओतून समोर आलं आहे. पंचवटीतील रामवाडी परिसरात एका महिलेच्या घरात घुसून दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नंदिनी नायक असे पीडित महिलेचं नाव आहे. गुरुवारी सकाळी त्या आपल्या घरात एकट्या असताना, तोंडाला मास्क लावलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरासमोर आले. 'काकू, काकू' असे म्हणत त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि पिण्यासाठी पाणी मागितले. नंदिनी यांनी माणूसकी दाखवत त्यांच्यावर विश्वास ठेवून दरवाजा उघडला.
(नक्की वाचा- Nagpur News: डिलिव्हरी बॉयचा भयंकर कारनामा, नागपुरातील धक्कादायक VIDEO आला समोर)
जसे त्यांनी पाणी देण्यासाठी हात पुढे केला, त्याच क्षणी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. नंदिनी यांनी त्वरित प्रतिकार करत एका चोरट्याचा टी-शर्ट पकडला आणि आरडाओरड सुरू केली. मात्र, चोरट्यांनी त्यांना धक्का देऊन सोनसाखळी घेऊन पळ काढला. या झटापटीत सोनसाखळीचा काही भाग तुटून खाली पडला, पण चोरटे 3 तोळ्याची सोनसाखळी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
(नक्की वाचा- लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येचा LIVE थरार! प्रेयसीला गोळ्या घातल्या...नंतर सर्वांसमोर नाचत बसला, पाहा Video)
या घटनेमुळे नंदिनी नायक यांना मोठा धक्का बसला. या चोरीची संपूर्ण घटना त्यांच्या घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. नाशिकमधील या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटना रोखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.