सुरज कसबे, पिंपरी-चिंचवड
वाढती थंडी आणि हिवाळ्यामुळे लवकर पडणारा अंधार लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता सर्व शाळा सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत भरणार आहेत.
वेळ बदलण्याचे मुख्य कारण
सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने सकाळी उशीरापर्यंत थंडी असते आणि संध्याकाळी लवकर अंधार पडतो. दुपारी 5:30 वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी परतताना अंधार पडतो. यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त केली जात होती. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य विचारात घेऊन प्रशासनाने वेळेत कपात व बदल करण्याचा तोडगा प्रशासनाने काढला आहे.
(नक्की वाचा- Buldhana News: डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू)
विद्यार्थ्यांना होणारे फायदे
- सकाळच्या कडाक्याच्या थंडीत लवकर बाहेर पडावे लागणार नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम टाळता येतील.
- सायंकाळी लवकर शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी अंधार पडण्यापूर्वी सुरक्षितपणे घरी पोहोचू शकतील.
- वेळेतील या बदलामुळे विद्यार्थ्यांना पुरेशी विश्रांती मिळेल, परिणामी वर्गातील उपस्थिती वाढून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होईल.
- विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पालकांची चिंता मिटली असून, मुलांनाही अभ्यासासाठी आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ ही मिळणार आहे.
(नक्की वाचा- Akola News: अकोला महापालिका निवडणुकीत भाजपची कोंडी; बंडखोरांची नवी आघाडी पक्षासाठी ठरणार डोकेदुखी)
शिक्षण विभागाच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सूचना
शाळेची वेळ बदलल्यानंतर वेळेआधीच शिक्षक आणि मुख्याध्यापकांना शाळेत हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांनी अनियमितता दाखवण्यास त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.