अमोल सराफ, बुलडाणा
आई-वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या बुलढाण्यातील डोंगरशेवली येथील तरुणी अपघाती मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. ऋतुजा सावळे असं मृत तरुणीचं नाव असून ती अवघ्या 19 वर्षांची होती. ती बुलढाणा येथील राजश्री शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय येथे प्रथम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होती.
कशी घडली घटना?
16 डिसेंबर रोजी सकाळी अंदाजे 8.30 वाजता ही घटना घडली. ऋतुजा दुचाकीवरून कॉलेजसाठी निघाली होती. गावापासून काही अंतरावर असताना, ती बसच्या बाजूने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने तिला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर तिचा तोल गेला अन् ती खाली कोसळली. या अपघातात तिच्या डोक्याल जबर मार लागला.
(नक्की वाचा- Akola News: अकोला महापालिका निवडणुकीत भाजपची कोंडी; बंडखोरांची नवी आघाडी पक्षासाठी ठरणार डोकेदुखी)
गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण महाविद्यालयीन परिसरासह डोंगरशेवली गावावर शोककळा पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, ती एमबीबीएस (MBBS) साठी देखील पात्र ठरली होती आणि आपल्या भविष्यासाठी ती सातत्याने कठोर परिश्रम घेत होती.
जिल्ह्यात दुचाकी अपघातांचे सत्र
बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजही शिक्षण घेण्यासाठी दररोज शहरांमध्ये दुचाकीवरून प्रवास करावा लागतो. गावातील झालेले सुसाट रस्ते आणि अनियंत्रित वेगावर मर्यादा नसल्यामुळे हे अपघात होतात.
(नक्की वाचा- Crime News: अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोळीबार! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर चार राऊंड फायर)
दोन दिवसांपूर्वीच शेगाव येथील वाटिका चौकात गतीरोधकामुळे झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय, चिखली तालुक्यातील करतवाडी येथील रहिवासी सतीश सदाशिव सपकाळ यांचाही नुकताच अपघात झाला. चिखली येथून गावाकडे जात असताना पेठ चढावर अमडापूरहून भरधाव वेगाने येणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world