Chhatrapati Sambhajinagar: जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या सहलीसाठी आलेल्या पर्यटकांना गुरुवारी एका भीषण अनुभवाला सामोरे जावे लागले. लेणी परिसरात अचानक मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 82 पर्यटक जखमी झाले आहेत. यामध्ये देशी पर्यटकांसह परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. दोन दिवसातील दुसऱ्या हल्ल्यामुळे लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
एकाच दिवशी दोन मोठे हल्ले
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी लेणी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होती. सकाळी 10 वाजेच्या सुमारास लेणी क्रमांक 10 जवळील एका आग्यामोहळातून मधमाशा अचानक बाहेर पडल्या आणि पर्यटकांवर तुटून पडल्या. पहिल्या घटनेनंतर अवघ्या तासाभरात लेणी क्रमांक 26 जवळ मधमाशांनी दुसरा हल्ला चढवला. जखमींपैकी काहींवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या (ASI) कार्यालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, तर गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Pimpri-Chinchwad: सावधान! वाकडमध्ये प्रवास करताना होऊ शकते फसवणूक; पाहा VIDEO, नेमकं काय होतंय?)
दोन महिन्यात सहावा हल्ला
अजिंठा लेणी परिसरात सध्या आग्यामोहळांचे सुमारे 13 मोठे पोळ आहेत. गेल्या दोन महिन्यांत पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला करण्याची ही सहावी घटना आहे. बुधवारी देखील दोनवेळा झालेल्या हल्ल्यात 11 पर्यटक जखमी झाले होते. सततच्या या त्रासामुळे अनेक पर्यटक निम्मीच लेणी पाहून अर्ध्या वाटेतून माघारी फिरत आहेत.
पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात
लेणी परिसरात मधमाशांचे पोळ काढणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असले तरी, पर्यटकांच्या वाढत्या तक्रारींमुळे पुरातत्व विभागावर दबाव वाढत आहे. वाढते तापमान आणि पर्यटकांचा गोंधळ यामुळे मधमाशा आक्रमक होत असाव्यात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पुरातत्व विभागाने यावर तातडीने उपाययोजना न केल्यास अजिंठ्याच्या पर्यटनावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world