Ajanta Caves Bee Attack 2026: जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बुधवारी लेणी परिसरात मधमाशांनी पर्यटकांवर दोन वेळा मोठा हल्ला चढवला. या हल्ल्यात देश-विदेशातून आलेल्या एकूण 11 पर्यटकांना चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अवघ्या दोन महिन्यांतील ही पाचवी घटना आहे.
एकाच दिवशी दोनवेळा झाला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, अजिंठा लेणीत पर्यटकांची मोठी गर्दी असताना अचानक मधमाशांनी हल्ला सुरू केला. सकाळी लेणी क्रमांक 10 जवळ असलेल्या मोहळातून मधमाशा अचानक बाहेर पडल्या आणि पर्यटकांवर तुटून पडल्या. यात काही पर्यटक जखमी झाले. पहिल्या घटनेनंतर तासाभराने लेणी क्रमांक 26 जवळ पुन्हा मधमाशांनी हल्ला केला. या दुसऱ्या हल्ल्यातही अनेक पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला.
(नक्की वाचा- Vande Bharat Train: 'वंदे भारत'मधील जेवणामुळे महिलेसोबत भयंकर घडलं, 2 वर्षांच्या चिमुरड्याला डायरिया)
दोन महिन्यात 5 घटना
अजिंठा लेणी पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात. मात्र, गेल्या दोन महिन्यांत मधमाशांच्या हल्ल्याची ही पाचवी घटना आहे. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या यंत्रणेला या मधमाशांना रोखण्यात यश येत नसल्याचे चित्र दिसत आहे.
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असूनही येथे मधमाशांच्या मोहळांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. भारतीय पुरातत्व विभाग (ASI) आणि पर्यटन विभागाने या मोहळांचा बंदोबस्त करण्यासाठी तज्ञांची मदत घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
पर्यटकांनी काय काळजी घ्यावी?
प्रशासनाकडून पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे की, लेणी परिसरात फिरताना गडद रंगाचे कपडे टाळावेत आणि सुगंधित द्रव्यांचा (Perfumes) वापर करू नये. कारण यामुळे मधमाशा अधिक आक्रमक होण्याची शक्यता असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world