जाहिरात

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! हायकोर्ट वकिलाची बीड बायपासवर निर्घृण हत्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च न्यायालयाचे वकील मिथुन भास्कर यांची बीड बायपास परिसरातील गांधेली फाट्याजवळ निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! हायकोर्ट वकिलाची बीड बायपासवर निर्घृण हत्या

अमोल मस्के, छत्रपती संभाजीनगर

उच्च न्यायालयाच्या एका वकिलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर येथून समोर आली आहे. बीड बायपास परिसरातील आनंद नगर भागात राहणारे वकील मिथुन भास्कर (49) यांचा मृतदेह बुधवारी रात्री उशीरा गांधेली फाट्याजवळ आढळून आला. या घटनेमुळे शहरात, विशेषतः विधी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेचा थरार

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. वकील मिथुन भास्कर यांच्या मांडीवर धारदार चाकूने गंभीर वार करण्यात आले होते. हल्ल्यानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुख्य रस्त्यापासून 150 फूट आत झुडुपांमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत. गुन्हेगारांनी तिथेच त्यांच्यावर हल्ला केला असावा. जीव वाचवण्यासाठी ते रस्त्यापर्यंत आले, मात्र मदतीपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

(नक्की वाचा-  VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झॉम्बी'? मुंबईसह परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?)

तपासातील महत्त्वाचे धागेदोरे 

घटनेची माहिती मिळताच एसीपी भागीरथी पवार आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. त्यांची गाडी घटनास्थळीच उभी होती. गाडीवर पोलिसांना दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे हाताचे ठसे आढळले आहेत, जे तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. गाडीच्या डिकीमध्ये काही न्यायालयीन कागदपत्रे सुरक्षित आढळली असून, आरोपींनी गाडीला स्पर्श केला नव्हता.

लूटमार की जुनं वैमनस्य?

प्राथमिक तपासात ही लूटमारीच्या उद्देशाने केलेली हत्या असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी वकील भास्कर तिथे कोणाला भेटायला गेले होते? की ही काही पूर्वनियोजित कटानुसार केलेली हत्या आहे? या प्रश्नांचे गुढ अद्याप कायम आहे.

एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके आरोपींच्या शोधात रवाना झाली आहेत. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com