Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरात शुक्रवारी दुपारी एक थरारक अपघात घडला. ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव आयशर ट्रक थेट विद्युत खांबाला जाऊन धडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे रस्त्याच्या कडेला बसलेले एक 70 वर्षीय आजोबा या भीषण अपघातातून बालंबाल बचावले आहेत. समोरून मृत्यू येत असताना केवळ एका खांबामुळे त्यांचे प्राण वाचल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, 9 मे रोजी दुपारी सुमारे 4 वाजेच्या सुमारास चालक सचिन जाधव हे आपला आयशर ट्रक क्रमांक एमएच 20 एएल 4328 घेऊन बजाजनगर परिसरातून कंपनीच्या दिशेने जात होते. यावेळी अचानक ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला असता ट्रकचे केबिन पलटी झाले. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि हा ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर जाऊन आदळला.
( नक्की वाचा : Nida Khan: मतीन पटेलचं घर रडारवर! निदा खानला घरामध्ये दडवलं, आता महापालिका घरच तोडणार, संभाजीनगरमध्ये धमाका )
कसा वाचला आजोबांचा जीव?
बजाजनगरमधील गोरख वाघ चौक परिसरात एक 70 वर्षांचे आजोबा चप्पल आणि बूट शिवण्याचे काम करून त्यांचा उदरनिर्वाह करतात. अपघात घडला तेव्हा ते नेहमीप्रमाणे त्यांच्या कामात व्यस्त होते. अनियंत्रित झालेला ट्रक त्यांच्याच दिशेने वेगाने येत होता. मात्र, ट्रक आणि आजोबांच्या मध्ये एक मजबूत विद्युत खांब आल्याने ट्रक तिथेच थांबला.
हा खांब तिथे नसता, तर आजोबांच्या जीवावर बेतले असते. ही स्थिती पाहून घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी देव तारी त्याला कोण मारी, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
मोठा अनर्थ टळला; जीवितहानी टळली
ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्यासमोरच मोठी सोसायटी आहे आणि रस्त्याच्या कडेला अनेक छोटे व्यापारी आपला व्यवसाय करतात. ट्रकचा वेग पाहता ही एक मोठी दुर्घटना ठरू शकली असती. मात्र विद्युत खांबामुळे ट्रक पुढे जाऊ शकला नाही. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अगदी ट्रक चालक सचिन जाधव हे देखील सुरक्षित आहेत.
भरदुपारी घडलेल्या या भीषण अपघाताच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. काही वेळ या भागात वाहतुकीची कोंडी देखील झाली होती. भरधाव वाहनांच्या वेगामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world