Chhatrapati Sambhajingar: "जादूटोण्यामुळेच माझा पराभव झाला!" फुलंब्रीत शिवसेना उमेदवाराचा खळबळजनक आरोप

फुलंब्री नगरपंचायतीसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडले. मात्र, मतदानाच्या दोन दिवस आधी प्रभाग क्रमांक 9 मधील 'भारत माता मतदान केंद्रा'समोर काही संशयास्पद साहित्य आढळून आले होते, ज्याचा संबंध जादूटोण्याशी लावला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणुकीतील पराभवाचे कारण चक्क 'जादूटोणा' असल्याचे सांगत एका उमेदवाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या तक्रारीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता एका वेगळ्याच वादाने तोंड वर काढले आहे. प्रभाग क्रमांक 9 चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अमित वाहुळ यांनी आपला पराभव जादूटोण्यामुळे झाल्याचा दावा केला असून, याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

फुलंब्री नगरपंचायतीसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडले. मात्र, मतदानाच्या दोन दिवस आधी प्रभाग क्रमांक 9 मधील 'भारत माता मतदान केंद्रा'समोर काही संशयास्पद साहित्य आढळून आले होते, ज्याचा संबंध जादूटोण्याशी लावला जात आहे.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

अमित वाहुळ यांच्या मते, मतदान केंद्रासमोर जादूटोण्याचे साहित्य पाहून अनेक मतदार भयभीत झाले. या भीतीपोटी अनेकांनी मतदान केंद्रावर जाणे टाळले किंवा आपला मतदानाचा निर्णय बदलला. हा प्रकार लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला काळिमा फासणारा असून, मतदारांवर मानसिक दबाव टाकण्यासाठीच हा जादूटोण्याचा बनाव रचला गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Advertisement

'अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या'न्वये कारवाईची मागणी

अमित वाहुळ यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायदा' अंतर्गत संबंधितांवर कडक गुन्हा दाखल करण्यात यावा, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. निवडणुकीच्या काळात अशा घटना घडणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(नक्की वाचा-  Ahilyanagar Election: खळबळजनक! अहिल्यानगरमध्ये मनसेचे 2 उमेदवार गायब; अपहरण झाल्याचा संशय)

पोलिसांची भूमिका

फुलंब्री पोलिसांनी तक्रार अर्ज स्वीकारला असून, या घटनेची सत्यता पडताळली जात आहे. खरोखरच जादूटोण्याचा प्रकार घडला होता की ही केवळ अफवा होती, याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी अद्याप एफआयआर (FIR) दाखल झालेला नसून, पोलीस प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article