प्रसाद शिंदे, अहिल्यानगर:
Ahilyanagar Mahapakila Election 2026: राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी, उमेदवारांची पळवापळवी अन् नाराजीनाट्याला ऊत आला आहे. अशातच अहिल्यानगरमधून एक हादरवणारा प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार गायब झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
मनसेचे दोन उमेदवार गायब...
महानगरपालिका निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच अहिल्यानगरमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मनसेच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरलेले दोन उमेदवार गेल्या २४ तासांपासून बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधकांनी या उमेदवारांचे अपहरण केल्याचा संशय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
BMC Election 2026: 'पैशासाठी निष्ठा विकली', ठाकरे गटात नाराजीनाट्य, 4 शाखाप्रमुखांचे राजीनामे
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १७ मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. विशेष म्हणजे, यातील एक उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासमोर, तर दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवारासमोर उभा होता. केडगाव हा भाग राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. याच भागातील दोन उमेदवार अचानक गायब झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
अपहरण झाल्याचा आरोप
मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. "गेल्या २४ तासांपासून या उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क झालेला नाही. निवडणूक बिनविरोध व्हावी या उद्देशाने सत्ताधारी किंवा प्रबळ उमेदवारांकडून त्यांचे अपहरण करण्यात आले असावे," असा आरोप सुमित वर्मा यांनी केला आहे.
याप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणाचा तातडीने तपास करून उमेदवारांचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world