Pune News: पुणेकरांनो काळजी घ्या! 'चिकनपॉक्स'च्या साथीने नागरिक चिंतेत, रुग्णांमध्ये मोठी वाढ

Chickenpox Outbreak in Pune: थंडीच्या लाटेनंतर बदललेल्या हवामानामुळे कांजिण्यांचा विषाणू वेगाने पसरत असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News: पुण्याच्या विविध भागांतील बालरोगतज्ज्ञांनी गेल्या एका महिन्यात कांजिण्यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, ज्यांना बालपणात हा आजार झाला नव्हता, अशा प्रौढ व्यक्ती आणि मोठ्या मुलांनाही याचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. थंडीच्या लाटेनंतर बदललेल्या हवामानामुळे हा विषाणू वेगाने पसरत असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांचे निरीक्षण

बालरोग विभाग प्रमुख डॉ. शिरीष कांकरिया यांनी सांगितले की, केवळ जानेवारी महिन्यातच त्यांनी 15 हून अधिक रुग्ण तपासले आहेत. मोठ्या वयात कांजिण्या झाल्यास 'एन्सेफलायटिस' (मेंदूला सूज येणे) सारख्या गंभीर गुंतागुंतीचा धोका वाढतो. तर डॉ. प्रतीक कटारिया यांच्या मते, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या मुलांमध्येही सौम्य लक्षणे दिसत आहेत. मात्र, लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. अशा विषाणूजन्य आजारांचा संसर्ग दर 3 ते 5 वर्षांनी वाढतो. यंदाही तीच लाट दिसून येत आहे.

(नक्की वाचा-  Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी)

प्रौढांसाठी नागीणचा धोका 

ज्यांना लहानपणी कांजिण्या झाल्या आहेत, त्यांच्या शरीरात हा विषाणू सुप्त अवस्थेत राहतो. 50 वर्षांनंतर किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यावर तोच विषाणू 'शिंगल्स' (नागीण) म्हणून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. डॉक्टरांनी 50 वर्षांवरील व्यक्तींना ची लस घेण्याचा सल्ला दिला आहे. भारतात सध्या या लसीचे प्रमाण केवळ 1 ते 3 टक्के आहे, जे वाढवणे गरजेचे आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबतचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

(नक्की वाचा-  Big News: CM फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर; NCP च्या विलिनीकरणावर मोठा निर्णय होणार?)

प्रतिबंधात्मक उपाय

  • लहान मुलांना कांजिण्यांच्या लसीचे दोन्ही डोस वेळेवर द्या.
  • लक्षणे दिसताच मुलाला किमान 7 ते 10 दिवस घरीच ठेवा, जेणेकरून इतरांना संसर्ग होणार नाही.
  • हात वारंवार धुवा आणि रुग्णाचे कपडे, भांडी वेगळी ठेवा.
  • अंगावर फोड आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वतः औषधे घेऊ नका.

पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयात सात वर्षांच्या एका मुलाला कांजिण्यांमुळे झालेल्या गंभीर मेंदूविकारातून (Encephalitis) वाचवण्यात यश आले आहे. या मुलाला फिट्स येणे, तीव्र ताप आणि शरीराचे अवयव निकामी होणे अशा स्थितीत दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

Advertisement
Topics mentioned in this article