
एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा; या कामांना विलंब चालणार नाही, पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किमी मेट्रो कार्यान्वित होतील, असे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री?
या बैठकीमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की, 'अनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहेत, त्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेत, त्याचा अभ्यास करा. त्याला तात्पुरत्या पर्यायी व्यवस्था काय आहेत, याचा आढावा घ्या. भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत, त्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा. पुढच्या वर्षीपासून 50 किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईल, याबाबत नियोजन करा. यावर्षी किमान 23 किमी मेट्रो सुरू होईल. तसेच मेट्रो-3 मुळे 20 ते 25 किलोमीटरची त्यात आणखी भर पडेल.
( नक्की वाचा : IAS Transfer : मुख्यमंत्र्यांनी दिले प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश, मुंडे बंधू-भगिनींना दिलासा )
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर 2025 अखेरीस पूर्ण करा. तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करण्याच्या सूचना श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world