प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत (CM Ladki Bahin Yojna) महिन्याला दर महिन्याला 1500 हजारांची रक्कम मिळत आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र काही महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक कारणांमुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आणि पैसे जमा झाले असले तरी बँकेतून ते पैसे हातात येऊ शकलेले नाही. नंदूरबारमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. पैसे मिळविण्यासाठी महिलांनी बँकेच्या बाहेर गर्दी केली आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात टाकले आहेत. मात्र अनेक महिलांनी ई-केवायसी न केल्यामुळे बँक खाते बंद झाले आहेत. बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच बँकेमध्ये ई-केवायसी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. ज्या महिलांचे केवायसी झाले असेल त्याच महिलांना या योजनेच्या लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभ घेण्यासाठी अनेक महिला सकाळपासून बँकेच्या बाहेर रांग लावून ई-केवायसी करण्यासाठी उभ्या राहत आहे. याचा महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नक्की वाचा - पुतळा वाऱ्यामुळे कोसळला? काय आहे खरी परिस्थिती? NDTV चा ग्राऊंड रिपोर्ट
नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख 61 हजारांपेक्षा अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र अनेक महिलांच्या ई-केवायसी नसल्याने महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे असतानाही काढता येत नसल्याने ई-केवायसीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये गर्दी होताना दिसून येत आहे. e-KYC ची प्रक्रिया बँकेकडून करून दिली जात आहे. त्यामुळे योजनेच्या पैसे मिळण्यात कुणाला अडचण येत असेल तर त्यांमी बँकेत जाऊन e-KYC करून घ्यावी. बँकेत जाताना आपला मोबाइल आणि आधार कार्ड घेऊन जावं.
कशी कराल e-KYC?
बँकेत गेल्यानंतर खातेदाराला आपला आधार नंबर अपलोड करावा लागतो. आधार कार्ड नंबर अपलोड करताना आधार कार्डची झेरॉक्स आणि ग्राहकाचे थम्ब देखील घेतले जातात. त्यानंतर ग्राहकाच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो. हा ओटीपी दिल्यानंतर ग्राहकाची केवायसी पूर्ण होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world