
प्रथमेश गडकरी
सिडकोने नवी मुंबईत माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली. त्यासाठी 26,000 हजार घरांची लॉटरीही काढण्यात आली. मात्र सर्व सामान्यांना परवडणारी घरं असं सिडकोने सांगितलं असलं तरी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. तशी ओरड लॉटरी विजेत्यांनीही केली होती. घराच्या किंमती कमी कराव्यात अशी मागणी वारंवार होत होती. पण त्याला सिडकोने काही प्रतिसाद दिला नाही. आता त्यात मनसेने उडी घेतली आहे. त्यामुळे सिडको काय भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिडकोच्या घराच्या किंमती या सर्वसामन्यांच्या आवाक्या बाहेरच्या आहेत. एकीकडे परवडणारी घरे आहेत असं सांगायचं आणि दुसरीकडे चढ्या दराने घरं विकायची अशी स्थिती आहे. त्यामुळे या घरांच्या किंमती कमी व्हाव्यात अशी मागणी आता महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं केली आहे. त्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे. मनसे वाशीमध्ये मानवी साखळी करुन आधी आपला निषेध व्यक्त करेल. त्यातून सिडकोला घरांच्या किंमती केल्या जाव्यात अशी विनंती केली जाईल.
सिडकोने पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे असा आरोप मनसेने केला आहे. घरांचे दर ठरवताना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले असल्याचा ही आरोप मनसेने केला आहे. यामध्ये एकाच ठिकाणी असलेल्या घरांच्या किंमतींमध्ये मोठा फरक आहे. 322 चौरस फूट घराचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात 290 चौरस फुटाचे घर सिडको देत आहे. ही बाब आता निदर्शनास आल्याचे मनसे तर्फे सांगण्यात आले.
तसेच ट्रक टर्मिनल आणि बस आगारावर घरे बांधून सिडको नफा कमवत आहे. सर्वसामान्यांना मात्र जास्त किंमतीत घरे विकली जात आहेत. त्यामुळे सिडकोने घरांच्या किंमती कमी कराव्यात आणि LIG घर मालकांची घरे नियमित करावीत अशा प्रमुख मागण्या मनसेकडून सिडकोकडे करण्यात आल्या आहे. या मागण्यांसाठी येत्या मंगळवारी,25 मार्च रोजी वाशीमध्ये मनसे आणि सिडको सोडतधारकांचे मानवी साखळी आंदोलन होणार असल्याची माहिती मनसे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहर प्रमुख गजानन काळे यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world