अमजद खान, कल्याण
दिल्लीतील भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना, कल्याण-डोंबिवलीतही या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. शहरातील नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांविषयी प्रचंड भीतीचे वातावरण आहे. गेल्या चार महिन्यांत सुमारे 8789 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त
कल्याण-डोंबिवलीतील अनेक सोसायट्या आणि रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर हे कुत्रे धावून जातात. काही दिवसांपूर्वीच कल्याणमधील एका शाळकरी मुलाच्या गुप्तांगाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. तर टिटवाळ्यात एका महिलेला कुत्र्याने चावा घेतल्याने मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
(नक्की वाचा - Stray Dogs Case: भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; धक्कादायक आकडेवारी आली समोर)
कल्याण पश्चिमेतील औदुंबर सोसायटीमध्ये प्रीती पेठे या दिव्यांग महिलेच्या अंगावर भटका कुत्रा धावून गेल्याने त्या खाली पडल्या आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे सोसायटीतील नागरिक प्रचंड संतापले असून, त्यांनी केडीएमसीला याविषयी तक्रार दिली आहे.
स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर केडीएमसीची गाडी कुत्र्यांना पकडण्यासाठी आली होती. मात्र, त्यावेळी काही 'प्राणी मित्रांनी' त्याला विरोध केला. त्यांच्या विरोधामुळे केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी कुत्र्यांना न पकडताच रिकाम्या हाताने परत जावे लागले. यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. यामुळे नागरिकांमध्ये आणि प्राणी मित्रांमध्ये वादाची स्थिती निर्माण झाली आहे.
नागरिकांची मुख्य मागणी आहे की, शहरात भटक्या कुत्र्यांसाठी योग्य शेल्टर होमची व्यवस्था केली पाहिजे. शहरात लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असून, प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
(नक्की वाचा- Ganeshotsav 2025: मुंबईकरांनो, कोकणात गणपतीला ST नेच जा! 30% भाडेवाढीचा 'तो' निर्णय रद्द)
महापालिकेत उपाययोजनांचा अभाव
केडीएमसीने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे कंत्राट एका खाजगी संस्थेला दिले आहे. मात्र या उपाययोजनांचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्या चार महिन्यांत 8789 लोकांना कुत्र्याने चावा घेतल्याने महापालिकेच्या रुग्णालयात त्यांना अँटी-रेबीज लस देण्यात आली आहे. या वाढत्या घटनांमुळे महापालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.