CM Devendra Fadnavis : नागपुरात नेमकं काय घडलं? CM फडणवीसांनी विधानसभेत घटनाक्रम सांगितला

CM Devendra Fadnavis : पोलीस शांतता प्रस्थापित करत होते, त्यावेळी हल्ला करणे चुकीचे आहे. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही, हल्लोखोरांना कुणालाही सोडलं जाणार नाही, असा कडक इशारा देखील फडणवीसांनी दिला.

जाहिरात
Read Time: 3 mins

CM Devendra Fadnvis on Nagpur Violence : नागपूरमध्ये सोमवारी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसात विधिमंडळात उमटले. नागपुरात झालेल्या दगडफेक, जाळपोळीच्या घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. नागपुरात नेमकं काय घडलं? यासाठी जबाबदार कोण? पोलिसांनी याबाबत काय कारवाई केली? याची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा घटनाक्रम विधानसभेत सांगितला. यावेळी त्यांनी म्हटलं की, काल नागपूर शहरात सकाळी साडेअकरा वाजता महाल परिसरात बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्यासंदर्भात आंदोलन केले. 'औरंगजेबाची कबर हटाव' असे नारे यावेळी त्यांनी दिले. यावेळी आंदोलकांनी  गवताची पेंढी असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना गुन्हे देखील दाखल केले.

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या आंदोलनानंतर काही तास शांतता होती. त्यानंतर सायंकाळी अफवा पसरवली गेली की जी प्रतिकात्मक कबर जाळली त्यावर धार्मिक मजकूर लिहिलेला होता. ही अफवा पसरल्यानंतर नमाज आटोपून निघालेला एक जमाव एकत्र झाला. जमावाने तेथे जोरदार नारेबाजी केली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. याआधी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली. मात्र एकीकडे पोलिसात तक्रार दाखल करत असाताना दुसरीकडे हंसापुरी भागात जमाव जमू लागला. हातात काठ्या घेत दगडफेक तेथे करण्यात आली. या घटनेत 12 दुचाकींचं नुकसान झालं आहे. तर काही लोक देखील यात जखमी झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. 

Advertisement

हिंसाचारात 33 पोलीस जखमी

दुसरीकडे भालदारपुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता 80-100 लोकांचा जमाव जमला होता. तिथे जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधूर आणि सौम्य बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. नागपूरच्या हिंसाचारात 33 पोलीस जखमी झाले आहेत. ज्यात 3 उपायु्क्त दर्जाचे पोलीस अधिकारी आहेत. एका अधिकाऱ्यावर तर कुऱ्हाडीने हल्ला केला. तर पाच नागरिक देखील जखमी झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nagpur Crisis News: दगड-विटांचा मारा, गाड्यांची जाळपोळ, परिसरात तणाव... नागपूर का पेटलं?

एकूण पाच गुन्हे दाखल

याप्रकरणी एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन गुन्हे गणेश पेठ पोलिसात दाखल झाले आहेत. तर तहसील पोलिसात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 11 पोलीस ठाण्यांच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक भागात नाकाबंदी लागू आहे.एसआरपीएफच्या पाच तुकड्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालकांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत राज्यभर कायदासुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही

सकाळची घटना घडल्यानंतर मधल्या वेळेत शांतता होती. मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचं लक्षात येत आहे. ट्रॉली भरून दगड तिथे आढळले, शस्त्रे आढळली आहेत. काही ठराविक घरांना टार्गेट केलं गेलं.निश्चित यात सुनियोजित पॅटर्न दिसत आहे. अशा लोकांवर कारवाई केली जाईल. कायदा सुव्यवस्था हाती घेण्याची परवानगी कुणालाही दिली जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते, त्यावेळी हल्ला करणे चुकीचे आहे. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही, हल्लोखोरांना कुणालाही सोडलं जाणार नाही, असा कडक इशारा देखील फडणवीसांनी दिला.

ट्रेंडिंग बातमी - Nagpur Crisis: नागपुरमध्ये जोरदार राडा! 2 गटात दगडफेक, पोलीस उपायुक्तांकडून कुऱ्हाडीने हल्ला

छावा चित्रपटामुळे भावना प्रज्वलित

छावा चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास सर्वांसमोर आणला. पण त्यानंतर राज्यात लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबावरचा राग देखील बाहेर येत आहे. तरी देखील राज्यात कायदसुव्यवस्था राखली गेली पाहिजे, म्हणून सर्वांना संयम राखला पाहिजे. महाराष्ट्र प्रगतीशील राज्य आहे. त्यामुळे येथील सामजिक घडी योग्य राहिली तर प्रगतीच्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल.

Topics mentioned in this article