Mumbai News: मुंबईतून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 10 महिन्यांच्या कालावधीत मुलींच्या गायब होण्याचे तब्बल 1,187 गुन्हे दाखल झाले आहेत. याचा अर्थ, शहरातून दिवसाला सरासरी 4 ते 5 मुली बेपत्ता होत आहेत. या गंभीर मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून आपली चिंता व्यक्त केली. या पत्रामध्ये त्यांनी अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर का चर्चा होत नाही? असा सवाल देखील केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
राज ठाकरे यांच्या पत्रावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र मी अद्याप वाचले नाही. मात्र एखादी मुलगी घरात भांडून निघून गेली आणि तीन-चार दिवसांनी घरी परत जरी आली तरी आपण बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करून घेतलेली असते. त्यामुळे ही संख्या आपल्याला मोठी दिसते.
मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा अनुभव असा आहे की, वर्षभरात 90 टक्क्यांपर्यंत मुली आपण परत आणतो किंवा त्याच परत येतात. पुढच्या वर्षात अजून काही मुली सापडतात किंवा घरी परत येतात. त्यामुळे आकडेवारी मोठी वाटत असली तरी परिस्थिती तशी नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
(नक्की वाचा- VIDEO: नवले पुलावर वसंत मोरे थोडक्यात बचावले! फेसबुक लाईव्ह दरम्यानचा व्हिडीओ आला समोर)
यापूर्वीही बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भात आकडेवारीसह त्याची कारणे मी दिली आहेत. राज ठाकरेंनी नेमकं काय पत्र लिहिले आहे हे मी वाचले नाही. मात्र त्यांच्या काही शंका असतील तर नक्की मी त्याला उत्तर देईन, असं आश्वासन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
काय आहे राज ठाकरेंचे पत्र?
सस्नेह जय महाराष्ट्र, एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
(नक्की वाचा- PWD च्या 111 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट; भिवंडी कोर्टाच्या निकालाने आरोपी आणखी अडचणीत)
राज्यात लहान मुली पळवल्या जात आहेत, लक्ष का नाही?
आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ? आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? असंही राज ठाकरे म्हणालेत.
हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे, असं राज ठाकरेंनी म्हटले आहे.
खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही ! असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा असल्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world