'मुख्यमंत्रिपदासाठी कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे सुरु', CM शिंदेंची ठाकरेंवर जिव्हारी लागणारी टीका

लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत, असे त्यांनी कबूल करून टाकले ते बरे केले. कुणालाच काही देण्याचे यांना माहीतच नाही. यांना फक्त घेणे माहीत आहे. यांच्याकडे दानत नाहीच, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्याकडून सडकून टीका केली होती. या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवत आहेत आहेत, अशी जिव्हारी लागणारी टीका उद्धव ठाकरेंवर केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं?

"काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते. वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही", असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला. 

(नक्की वाचा-  'अमित शहा नाही तर हे अहमद शाह अब्दाली', ठाकरे थेट भिडले)

उद्धव टाकरेंची देण्याची दानतच नाही

"लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत, असे त्यांनी कबूल करून टाकले ते बरे केले. कुणालाच काही देण्याचे यांना माहीतच नाही. यांना फक्त घेणे माहीत आहे. यांच्याकडे दानत नाहीच. आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपयेही तुमच्या डोळ्याला टोचतात. बहिणीला ओवाळणी देण्याची संस्कृतीही यांना मान्य नाही? त्यामुळेच आता मिळतात अगदी तेवढे पैसेही बहिणींना देणार नाही, असे हे सांगतात. त्यांची महिला वर्गाबद्दलची आस्थाही यांच्या हिंदुत्वासारखीच बेगडी आहे", असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.  

उद्धव ठाकरेंवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत शिंदे यांनी म्हटलं की, "कोविड रुग्णांच्या तोंडची खिचडी खाणाऱ्या, बॉडी बॅगमधूनही कमिशन ओरपणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार हा शब्द बोलण्याची हिंमत करावी? राज्यातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा पाठिंबा आणि सढळ हस्ताने होणाऱ्या मदतीला भीक म्हणून संबोधत हेटाळणी करणारे, विरोध करणारेच खरे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पण पैसे आमच्या सरकारने दिले, हे ध्यानात ठेवा." 

(नक्की वाचा-  '... तर शरद पवार पंतप्रधान झाले असते', सुशिलकुमारांनी सांगितला भन्नाट किस्सा)

मोदी-शाहांवर बोलण्याची तुमची पात्रता नाही

"देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का हे जरा काही जणांनी आरशात बघावे. बाळासाहेबांनी राजकारण व हिंदुत्वाची गल्लत केली, असे बोलणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का? हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही. निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये. अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे", असं चॅलेन्ज देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.  

"महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत. या घरबशांना लोक पुन्हा कायमचे घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपचे हिंदुत्व मान्य आहे का, असा प्रश्न नागपूरमध्ये सरसंघचालकांना विचारला गेला. तुम्ही तुमच्या शिवसेनेचेच हिंदुत्व बासनात बांधले... ते आधी लोकांसमोर कबूल करा", अशी टीका देखील एकनाथ शिंदे यांनी केली. 
 

Topics mentioned in this article