CM Devendra Fadnavis: राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. सह्याद्री अतिथीगृहात मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी सर्व प्रकल्पांना नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकास प्रकल्पांचे नियोजन करताना नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षांत पूर्ण झाले पाहिजेत, असे स्पष्ट केले. तसेच, प्रकल्प तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला.
मेट्रो प्रकल्पांच्या डेडलाईन्स
मेट्रो लाईन – 2B: डी.एन.नगर ते डायमंड गार्डन-मंडाले या मार्गावर धावणारी एकूण 19 स्टेशन्स असणारी ही मेट्रो 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो लाईन: ही मेट्रो लाईन 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. यातील श्याम नगर स्टेशन येथील जमिनीसंदर्भातील अडचणी नगरविकास विभागाने 15 दिवसांत सोडवाव्यात, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
पुणे मेट्रो लाईन 3: पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेले मान-हिंजेवाडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 चे काम 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. नायगाव बीडीडी चाळ प्रकल्प जून 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिली. वरळी बीडीडी चाळ प्रकल्प मे 2029 पर्यंत पूर्ण करा. तर एन. एम. जोशी बीडीडी चाळ प्रकल्प जून 2031 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
महत्त्वाचे रस्ते आणि सी लिंक प्रकल्प
शिवडी ते वरळी जोडमार्ग: हा प्रकल्प दिवसरात्र कामे करून पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा, उत्तन विरार सी लिंक आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा हे सर्व प्रकल्प योग्य नियोजन करून वेळेत पूर्ण होतील, असे पाहण्याचे निर्देश देण्यात आले.
ऐरोली-कटई नाका फ्रीवे: या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 20 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. यासाठी MMRDA ने जमीन अधिग्रहणासाठी तात्काळ रक्कम देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
वडपे-ठाणे रस्ता (MSRDC): 23.8 कि.मी. लांबीचा हा रस्ता मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. हा रस्ता समृद्धी महामार्गासाठी महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वांद्रे -वर्सोवा सी लिंक: या प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आणि कंत्राटदाराला तातडीने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
वर्सोवा ते दहिसर ते भाईंदर कोस्टल रोड: केंद्र सरकारकडून खार जमिनीची परवानगी मिळाली असून, हा प्रकल्प 30 डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्याचे आदेश देण्यात आले.
इतर सूचना : मागाठाणे-गोरेगाव डी.पी.रोडच्या कामात जमीन अधिग्रहण आणि प्रकल्पग्रस्तांसाठी निवासस्थानाचे काम गतीने पूर्ण करावे. फिल्म सिटी गोरेगाव ते खिंडीपाडा मुलुंड येथील दुहेरी बोगद्यांचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी जास्त मनुष्यबळ नियुक्त करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world