भुपेंद्र आंबवणे, भिवंडी
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य आता वाहनचालकांच्या जीवावर उठले आहे. शहापूर तालुक्यातील भारंगी नदीच्या पुलावर आज सकाळी घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी अपघातात ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलातील एका जवानाचा करुण अंत झाला. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने हा अपघात घडला. कर्तव्यनिष्ठ जवानाचा अशाप्रकारे रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने शहापूर तालुक्यासह ठाणे महापालिका वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. विकास लहू गोरे (वय 31) असे मृत जवानाचे नाव आहे.
कामावर जाताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर-सरलंबा रोडवरील बामणे गावचे रहिवासी असलेले विकास गोरे हे ठाणे महानगरपालिका अग्निशामक दलात सेवा बजावत होते. आज सकाळी विकास गोरे हे आपल्या बुलेट दुचाकीने नेहमीप्रमाणे कर्तव्यावर (ड्यूटीवर) जात होते.
मुंबई-नाशिक महामार्गावरील भारंगी नदीच्या पुलावर आले असता, रस्त्यावरील मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांची बुलेट थेट खड्ड्यात आपटली. खड्ड्यात गाडी आदळल्याने विकास यांचा ताबा सुटला आणि ते रस्त्यावर जोरदार फेकले गेले. थेट रोड डिव्हायडरवर आपटल्याने त्यांच्या गुप्तांगाला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.
(नक्की वाचा- Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम)
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विकास गोरे यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रशासनाविरुद्ध स्थानिकांचा तीव्र संताप
मुंबई-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. अनेकवेळा तक्रारी करूनही रस्ता दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
(नक्की वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये 'आय फ्लू'चा उद्रेक! पावसाळ्यात डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण वाढले; डॉक्टरांचा गंभीर इशारा)
"प्रशासकीय निष्काळजीपणामुळे एका तरुण आणि कर्तव्यनिष्ठ जवानाचा जीव गेला आहे," अशी उद्विग्न प्रतिक्रिया मृत विकास गोरे यांच्या नातेवाइकांनी दिली. महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शहापूरमधील स्थानिकांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world