लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस महाविकास आघाडीत मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने 13 जागांवर विजय मिळवला. लोकसभेतील निकालाचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपात दिसून येण्याची शक्यता आहे. काँग्रेसची मुंबईत रविवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत जागावाटपात अधिक वाटा मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष तयारी करत आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रभारी चेनिथलाल राज्यात पुढील काळात विभाग निहाय लक्ष देणार आहेत. त्यासाठीचं धोरण बैठकीत ठरलं आहे. काँग्रेस पक्ष विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई सर्वाधिक जागांवर दावा करण्याची दाट शक्यता आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी मा. श्री. @chennithala सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या समितीची बैठक पार पडली. यावेळी विद्यमान राजकीय परिस्थिती, आगामी निवडणुकीसाठी… pic.twitter.com/sIMqujJlAX
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) August 4, 2024
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी चेनिथलाल विभागनिहाय काँग्रेस आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. जागावाटपात कोणत्या विधानसभा मतदारसंघांवर दावा करायचा याचं नियोजन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
बैठकीत काय ठरलं?
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाकडून जागावाटप करताना दोन नेत्यांची समिती असणार आहे. मुंबईसाठी वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात तर उर्वरित राज्यात नाना पटोले यांच्या नेतृत्वात जागा वाटप समिती असेल. महाविकास आघाडीत जागावाटपासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय विभागणी केली जाणार आहे. विद्यमान विजयी आमदार विधानसभा मतदारसंघ, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मतदारसंघ, तसेच अदलाबदली करून घ्यायचे असल्यास मतदारसंघ कोणते याची वर्गवारी केली जाईल. महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाला कोणते मतदारसंघ द्यायचे याची लिस्ट देखील केली जाईल.
मुंबईतही सर्वाधिक जागांवर दावा करणार
मुंबईत जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाच्या दबावाला बळी पडायचे नाही. लोकसभेत जागावाटपात ठाकरे गटामुळे विजयी मतदारसंघ सोडावे लागले. आता मात्र विधानसभा जागावाटपात दबावास बळी पडायचे नाही, असं मत काँग्रेस नेत्यांनी कालच्या बैठकीत व्यक्त केलं. जागावाटपात मुंबईत सर्वाधिक जागा घेण्याबाबत काँग्रेस पक्ष ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world