राहुल कुलकर्णी, पुणे
पुण्याच्या लष्कर भागातील एका साऊथ इंडियन हॉटेल चालकाला तीन उत्तप्यांची ऑनलाइन ऑर्डर चांगलीच महागात पडली. एका ग्राहकाने तीन उत्तप्पे मागवले होते, मात्र हॉटेलने एकच उत्तप्पे पाठवले. त्यातून झालेल्या मनस्तापातून ग्राहकाने थेट ग्राहक आयोगाचा दरवाजा ठोठावला. दोन्ही बाजू ऐकून ग्राहकाला त्रुटीयुक्त सेवा दिल्याने नुकसानभरपाई आणि दाव्याच्या खर्चापोटी दहा हजार रुपये देण्याचे आदेश आयोगाने उपाहारगृहचालकाला दिले
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अरुण गायकवाड, सदस्या प्रणाली सावंत आणि कांचन गंगाधरे यांनी याबाबतचा निकाल दिला. या प्रकरणी ग्राहक हितरक्षणाय फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. महेंद्र दलालकर यांनी लष्कर भागातील उपाहारगृहाचे मालक, व्यवस्थापक-मालक, तसेच ऑनलाइन पद्धतीने खाद्यापदार्थ पोहोचविणाऱ्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला होता.
ट्रेंडिंग बातमी - खेळता खेळता खाली कोसळली, जीवानिशी गेली, 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची आई आणि पत्नी आजारी असल्याने 5 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी त्यांनी नाश्त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अॅपवरुन 3 कांदा उत्तपा आणि दोन (प्लेट) मेदूवडा सांबार मागवले. त्यांनी 389 रुपये जमा केले. मात्र, उपहारचालकाने केवळ एकच कांदा उत्तपा आणि दोन प्लेट मेदूवडा सांबार पाठवले. तक्रारदारांनी उपहारगृहात संपर्क साधून तक्रार दिली.
उपाहारगृह व्यवस्थापनाने ही बाब मान्य केली, तसेच दोन प्लेट कांदा उत्तपाचे 158 रुपये परत केले. तसेच, ऑनलाइन पद्धतीने खाद्यापदार्थ पोहोचवणाऱ्या तक्रारदाराला 29 रुपयांचे कूपन पाठवले. तक्रारदाराची आजारी आई आणि पत्नीला वेळेत नाश्ता न मिळाल्याने औषध घेता आले नाही. त्यामुळे मागणीपेक्षा कमी खाद्य पदार्थांचा पुरवठा करत त्रुटीयुक्त सेवा दिल्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्यासाठी तक्रारदाराने आयोगाकडे तक्रार दिली होती.
ट्रेंडिंग बातमी - सिडकोचा आणखी एक मोठा निर्णय, पसंतीच्या घरासाठी आता...
त्यावर, संबंधित उपहारगृहचालकाने लेखी जबाब सादर केला. तक्रारदाराची दावा फेटाळण्याची विनंती केली. उपहारगृहचालकाने दोन प्लेट कांदा उत्तपाचे पैसे परत केले असून, तक्रारदारांनी ते स्वीकारले आहेत. खाद्यापदार्थ पोहोचवणाऱ्या कंपनीकडून ‘ऑर्डर' आल्यानंतर ती व्यवस्थित पडताळूनच ग्राहकाला पुरवली जाते, असा युक्तिवाद उपहारगृहाच्या वकिलांनी केला. मात्र, त्याबाबतचा कोणताही पुरावा सादर केला नाही.