मुंबईतील गोवंडी परिसरात एका क्रिकेट प्रशिक्षकाने आपल्याच 13 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवनार पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रशिक्षकाला अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा प्रकार गेल्या आठवड्यात मैदानातील 'रेस्ट रूम' मध्ये घडल्याचे पोलिसांनी सांगितले. हे क्रीडांगण मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित येते.
पीडित मुलगी घाटकोपरची रहिवासी असून, ती गेल्या काही महिन्यांपासून प्रशिक्षणासाठी गोवंडीला जात होती. प्रशिक्षणांनंतर ती रेस्ट रूममध्ये विश्रांती घेत असताना, आरोपी तिथे आला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
(नक्की वाचा- Navi Mumbai: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 5 रुग्णांनी गमावली दृष्टी; बाप लेकाविरोधात गुन्हा दाखल)
या घटनेनंतर आरोपीने पीडितेला याबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती, त्यामुळे ती शांत राहिली. मात्र, तिच्या वागणुकीत बदल झाल्याने तिच्या आई-वडिलांना संशय आला. त्यांनी वारंवार विचारणा केल्यानंतर पीडितेने भीतीपोटी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी घाटकोपरमधील पंत नगर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. गुन्हा देवनारच्या हद्दीत घडल्यामुळे, पंत नगर पोलिसांनी 'झिरो एफआयआर' दाखल करून पुढील तपास देवनार पोलिसांकडे सोपवला. 'मिड डे'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Cloud burst video: संपूर्ण गावाला नदीनं गिळलं, ढगफुटीची दृश्य पाहून काळीज थरथरलं, पाहा Video)
आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल
देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव राजेंद्र पवार असून तो गोवंडीचा रहिवासी आहे. अटकेनंतर केलेल्या तपासामध्ये आरोपी राजेंद्र पवारवर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.