विरार येथे एका 33 वर्षीय महिलेला करवा चौथच्या उपवासादरम्यान स्ट्रोक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेने तब्बल 17 तास पाण्याविना उपवास केला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञ डॉक्टरांनी धार्मिक उपवासाच्या पद्धतींसोबतच कोविड संसर्ग आणि लसीकरणामुळे तरुण लोकांमध्ये स्ट्रोकचा धोका कसा वाढला आहे, याबद्दल गंभीर इशारा दिला आहे.
कोविड संसर्ग आणि लसीकरणामुळे वाढला स्ट्रोकचा धोका
या महिलेवर उपचार करणारे वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड येथील न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन पै म्हणाले की, "महामारीच्या काळात, कोविड लसीकरण आणि संसर्ग या दोन्हीमुळे तरुणांमध्ये स्ट्रोकच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली होती." आजकाल कोविड-संबंधित केसेस कमी झाल्या असल्या तरी, धोका पूर्णपणे संपलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
उपवासामुळे स्ट्रोक कसा आला?
मिळालेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी या महिलेने पहाटे 4 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत उपवास केला. व्रत सोडण्यापूर्वी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास तिला अचानक स्ट्रोकचा झटका आला. महिलेचा चेहरा एका बाजूला झुकला आणि तिला वॉटर प्युरिफायर सुरू करणेही शक्य झाले नाही, असे तिच्या पतीने सांगितले.
(नक्की वाचा- Crime News: इंजिनिअर तरुणीला थायलंडमध्ये विकले, नोकरीला लावण्याच्या बहाण्याने फसवणूक)
कुटुंबीयांनी तिला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे स्ट्रोकचे निदान झाले, परंतु न्यूरोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने, तिला थ्रोम्बोलिटिक इंजेक्शन दिल्यानंतर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
डॉ. पवन पै यांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की, इमेजिंग तंत्रज्ञानामुळे तिच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धमनीमध्ये एक मोठी रक्तगाठ पूर्णपणे अडकल्याचे उघड झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता तिची मेकॅनिकल थ्रोम्बेक्टोमी ही तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्याद्वारे ती रक्तगाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. अवघ्या काही तासांत तिच्या शरीराच्या डाव्या बाजूच्या हालचालीत सुधारणा झाली आणि वेळेवर उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला.
डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत सांगितले की, डिहायड्रेशन हेच स्ट्रोकचे प्राथमिक कारण होते. डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होते आणि यामुळे रक्त गोठून स्ट्रोकचा धोका वाढतो.