
Marathi Language Row: राज आणि उद्धव ठाकरे यांच्या 5 जुलै रोजी होणाऱ्या विजयी सभेपूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा अस्मितेचा मुद्दा जबरदस्त तापला आहे. मीरा रोड इथे एका दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मनसैनिकांनी त्याला चोप दिला होता. सुशील केडिया नावाच्या एका गुंतवणूकदाराने मी मराठी शिकणार नाही बोल काय करणार आहेस, असा एकेरी उल्लेख करत राज ठाकरेंना डिवचलं होतं. या सगळ्या घटनांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'भाषेवरून कोणी गुंडगिरी करणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही' असं म्हणत ठाकरेंना इशारा दिला आहे.
( नक्की वाचा: Sushil Kedia: 'मी प्रतिज्ञा करतो मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते कर, ठाकरेंना भिडणारा 'तो' कोण? )
इंग्रजीला मिठी मात्र हिंदीला विरोध, असे का?
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले की, भाषेवरून कोणी गुंडगिरी करणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, भाषेसाठी कोणी मारहाण करत असेल तर आम्ही सहन करणार नाही,भाषेवरून कोणी वाद करेल तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,भारतातील कोणत्याही भाषेसंदर्भात अन्याय केला जाणार नाही,ही मंडळी इंग्रजीला मिठी मारतात आणि हिंदीवरून वाद घालतात, हा काय प्रकार आहे?
( नक्की वाचा: एकनाथ शिंदें म्हणाले 'जय गुजरात', अजित पवारांनी वाजवल्या टाळ्या! पाहा Video )
मारहाण कशासाठी?
फडणवीस पुढे म्हणाले की, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. एखादा मराठी माणूस आसाममध्ये व्यापार करत असेल आणि त्याला आसामी भाषा शिकायला वेळ लागेल तर त्याला तिथल्या लोकांनी मारायचं का ? खरा अभिमान असेल तर मराठीची सेवा करा, मराठी शिकवा, क्लासेस चालू करा, मराठी बोलायला प्रवृत्त करा आणि आपल्याही मुलांना मराठी शिकवा, मराठी शाळेत शिकवा. महापालिकेच्या शाळा अशा का सुरू करता जिथे मराठी तिसरी भाषा असेल.
एकनाथ शिंदेंचे समर्थन, पवारांच्या वक्तव्याची करून दिली आठवण
फडणवीसांनी म्हटले की, यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना शरद पवारांनी जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हटले होते. याचा अर्थ त्यांचे जास्त प्रेम कर्नाटकवर आहे आणि महाराष्ट्रावर नाही असा होत नाही. आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी तसे बोलत असतो. गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे एकनाथ शिंदे यांचे मराठी, महाराष्ट्रावरील प्रेम कमी झाले आणि गुजरातवर प्रेम वाढलं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हटले की, महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, दुराग्रह करू शकत नाही. उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणी मला तमीळ शिकली पाहीजे असा दूराग्रह करू शकत नाही. आपण एका देशात राहातो, बाजूचे राज्य ही काही पाकिस्तान नाहीये.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world