अमजद खान आणि योगेश शिरसाठ, NDTV मराठी
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नगरपालिकांच्या सत्तास्थापनेवरून विचित्र आणि आश्चर्यकारक समीकरणे पाहायला मिळत आहेत. अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे, तर अकोटमध्ये चक्क 'एमआयएम'सोबत (MIM) आघाडी केली आहे. या 'विचित्र' युतीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज असल्याचे समजते आहे.
"काँग्रेस मुक्त भारत" आणि "व्होट बँक" च्या राजकारणावर टीका करणाऱ्या भाजपला आता स्थानिक पातळीवर सत्तेसाठी त्याच पक्षांशी तडजोड करावी लागली आहे. अंबरनाथ आणि अकोट नगरपालिकेत झालेली ही युती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी
सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही प्रकरणांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज आहेत. "काँग्रेससोबत का गेले?" अशी विचारणा ते स्थानिक नेत्यांकडे करणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अशा युतीमुळे मतदारांमध्ये भाजपच्या विचारधारेबद्दल चुकीचा संदेश गेल्याचे मुख्यमंत्र्यांचे मत आहे. स्थानिक नेत्यांनी प्रदेश नेतृत्वाला विश्वासात न घेता हे निर्णय घेतल्याने शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
अंबरनाथमध्ये शिंदे सेनेला धक्का देत भाजप-काँग्रेस एकत्र
अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजूले यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) मनीषा वाळेकर यांचा पराभव केला. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने पारंपरिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला डावलून काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेचे 28 नगरसेवक असूनही त्यांना सत्तेबाहेर राहावे लागले.
सत्तेचे गणित - भाजप (15) + काँग्रेस (12) + राष्ट्रवादी अजित पवार गट (4) = 31 सदस्य.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापुरात रात्रीच्या वेळी भयंकर घडतंय, धडकी भरवणारा VIDEO आला समोर)
अकोल्यात 'अकोट विकास मंचा'त भाजप आणि MIM एकत्र
अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत तर त्याहूनही मोठा धक्का बसला आहे. तिथे भाजपने एमआयएम (MIM) या पक्षासोबत आघाडी केली आहे. भाजप (11) आणि एमआयएम (5) यांनी मिळून 'अकोट विकास मंच' स्थापन केला आहे. विशेष म्हणजे यात ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह बच्चू कडूंचा प्रहार पक्षही सामील झाला आहे.