Mithi River Promenade: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मुंबईकरांसाठी आणि विशेषतः धारावीतील रहिवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून धारावीचा चेहरामोहरा बदलतानाच पर्यावरणाचा समतोल राखण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. मिठी नदीचे पुनरुज्जीवन हा या संपूर्ण उपक्रमाचा मुख्य कणा ठरणार असून, यासाठी तब्बल 40000 वृक्षांचा आधार घेतला जाणार आहे.
या हरित परिवर्तनाचा एक भाग म्हणून मिठी नदीच्या लगत 3.3 किमी लांबीचा भव्य आणि आकर्षक सार्वजनिक फेरफटका मार्ग (Promenade) साकारण्यात येणार आहे. हा मार्ग माटुंगा कल्व्हर्टपासून थेट मिठी नदीच्या मुखापर्यंत विस्तारलेला असेल. सर्व मुंबईकरांसाठी खुला असणाऱ्या या नदीकिनार्यावर निरीक्षण मंच (व्ह्यूइंग डेक), कॅफे आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी विशेष जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मिठी नदीकाठचा नवा अवतार
नदीकिनारा अधिक सक्षम आणि निसर्गरम्य करण्यासाठी स्थानिक प्रजातींची झाडे आणि प्रदूषण शोषून घेणाऱ्या वनस्पतींची लागवड केली जाईल. याशिवाय पावसाच्या पाण्याचे नियोजन, भूजल पुनर्भरण वाढवणे आणि नदी परिसंस्थेच्या आरोग्यासाठी पारग्य फरसबंदी आणि बायोस्वेल्स यांसारख्या आधुनिक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.
हा नदीकिनारा पादचारी व सायकलस्वारांसाठी तयार करण्यात येणाऱ्या 15 मीटर रुंदीच्या ग्रीन स्पाइन आणि एका मोठ्या सेंट्रल पार्कशी जोडला जाईल.

वृक्षतोडीच्या पाचपट नवी झाडे
धारावी आणि परिसरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच शहरी तापमान कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने 40000 वृक्षांचे पुनरुज्जीवन आणि लागवड केली जाणार आहे. पुनर्विकासादरम्यान होणाऱ्या प्रस्तावित वृक्षतोडीच्या तुलनेत ही संख्या जवळपास पाचपट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) एकूण दोन लाख प्रतिपूरक वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन आहे.
( नक्की वाचा : Dharavi News: 'मला नवीन घर कधी मिळणार?'; धारावीकरांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आता थेट WhatsApp आणि कॉलवर! )
पालघरमध्ये 30000 वृक्षांची लागवड पूर्ण
प्रतिपूरक वनीकरणाचा एक भाग म्हणून पालघर जिल्ह्यातील चहाडे गावात आधीच 30000 वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. चालू पावसाळ्यात एकूण 75000 वृक्षांची लागवड करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण वृक्षलागवडीची आणि पाच वर्षांच्या संगोपनाची जबाबदारी अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (ANDPL) उचलणार आहे. यासाठी टेराकॉन या पर्यावरण सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, दर सहा महिन्यांनी वृक्षांच्या अस्तित्वाचा अहवाल सादर केला जाणार आहे.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world