Mumbai : दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी मंत्री नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी केली आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अभिनेता आदित्य पांचोली आणि दिनो मौर्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नितेश राणे यांनी म्हटलं की, दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टाच याचिक दाखल केली आहे. त्यामुळे सु्प्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बलात्काराचा आरोप झाल्यास तत्काळ आरोपींना अटक करुन कारवाई करावी. याबाबत आमदार अमित साटम यांच्यासह इतर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी सरकारकडे मागणी केली. त्यामुळे ज्यांची नावे दिशा सालियनच्या वडिलांनी घेतली आहे, त्या सर्वांना अटक केली पाहिजे. त्यानुसार, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सरकार म्हणून कुणालाही पाठिशी घालणार नाही, अशी भूमिका योगेश कदम घेतल्यातं नितेश राणे म्हणाले.
SIT समोर हजर का झाले नाही?
एसआयटीसमोर हजर का झाले नाही? यावर बोलताना नितेश राणे यांनी म्हटलं की, दिशा सालियन प्रकरणाच्या तसापात चिमाजी आढाव नावाचा अधिकारी सामील होता. तोच अधिकारी एसआयटीमध्येही होता. यावरून मी एसआयटी प्रमुखांना पत्र लिहिलं होतं की, तुम्ही मला कुणासमोर चौकशीला बोलवत आहात. ज्यांच्यावर आम्हाला संशय आहे, त्यांच्यासमोर जाऊनच आम्ही पुरावे सादर करु. जेणेकरून तो अधिकारी आरोपींना पुरावे देईल, असं नितेश राणे यांनी म्हटलं.
भाजप आमदार अमित साटम काय म्हणाले?
भाजप आमदार अमित साटम यांनी म्हटलं की, देशात नाही तर जगभरात संभ्रमाचे, संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दिशा सालियन संशयास्पद मृत्यू होण्याआधी पार्टी झाली होती का? पार्टीत कोण कोण होते? कशामुळे तिचा संशयास्पद मृत्यू अथवा खून झाला? याबद्दलचे वेगवेगळे प्रवाह समोर येत आहेत. एसआयटी नेमूनही दोन वर्षानंतरही याबद्दलचा निष्कर्ष समोर आलेला नाही. दिशा सालियन यांच्या वडिलांनी काही आरोप केलेत. तिच्यावर गँगरेप करून तिचा खून केला असा त्यांना संशय आहे, यासाठी त्यांनी याचिका केली. त्यावेळच्या मविआ सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यावेळच्या महापौर भेटल्यानंतर त्यांची दिशाभूल करण्यात आली, माध्यमांसमोर येण्यापासून रोखलं. त्यांना संशय नाही तर त्यांना खात्री आहे की त्यांच्या मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आला आहे. त्यावेळच्या सरकारमधील मंत्री याला जबाबदार आहेत असा त्यांना संशय आहे.
गृहराज्यमंत्र्यांचा अटकेच्या मागणीला पाठिंबा
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं की, एसआयटीमार्फत याची चौकशी सुरू आहे. अद्याप या एसआयटीचा अहवाल मिळू शकलेला नाही ही वस्तूस्थिती असली तरी तपास अधिक जलद गतीने केला जाईल. दिशा सालियनचे वडील कोर्टात गेल्याचं प्रसारमाध्यमांमधून समोर आलं आहे. कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करू. तर शंभूराज देसाई यांनीही नितेश राणे यांच्या आरोपींच्या अटकेच्या मागणीला दुजोरा दिला.