जाहिरात

Dombivli News: डोंबिवलीत शोभायात्रेपेक्षा 'या' गुढीची का होतीय चर्चा? 28 वर्षांत पहिल्यांदाच योग

Dombivli Gudi Padwa 2026: सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत यंदाचा गुढीपाडवा अतिशय दिमाखात साजरा झाला.

Dombivli News: डोंबिवलीत शोभायात्रेपेक्षा 'या' गुढीची का होतीय चर्चा? 28 वर्षांत पहिल्यांदाच योग
Dombivli Gudi Padwa 2026: डोंबिवलीत निघालेल्या शोभायात्रेत एक गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत होतीा.
डोंबिवली:

Dombivli Gudi Padwa 2026:  सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत यंदाचा गुढीपाडवा अतिशय दिमाखात साजरा झाला. नववर्ष स्वागत यात्रेचे यंदाचे 28 वे वर्ष असून, डोंबिवलीकरांच्या उत्साहाने संपूर्ण शहर न्हाऊन निघाले होते. या सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते नेहरू मैदानात उभारलेल्या एका महाकाय गुढीने. 

तब्बल 150 फूट उंचीची ही गुढी विशाल हिंदुत्व आणि भव्य सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून डौलाने उभी होती. तरुण पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीशी जोडून ठेवण्यासाठी श्री गणेश मंदिर संस्थानाच्या माध्यमातून सुरू झालेली ही संकल्पना यंदा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे.

150 फुटांची महाकाय गुढी आणि सांस्कृतिक वारसा

डोंबिवलीतील या भव्य गुढीबाबत बोलताना भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अभिमान व्यक्त केला. ही महाकाय गुढी केवळ एक आकडा नसून ती आपल्या संस्कृतीच्या भव्यतेचे दर्शन घडवणारी आहे, असे त्यांनी सांगितले. या संकल्पनेचे श्रेय त्यांनी आबासाहेब पटवारी आणि सुधीर जोगळेकर यांसारख्या ज्येष्ठ डोंबिवलीकरांना दिले. हिंदू संस्कृतीच्या नव्या वर्षाची सुरुवात इतक्या मंगलमय पद्धतीने व्हावी, हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Latest and Breaking News on NDTV

वंदे मातरम् आणि संघ शताब्दीचा योग

यंदाच्या स्वागत यात्रेत दोन अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचे प्रतिबिंब उमटले होते. 'वंदे मातरम्' या राष्ट्रगानाचे 150 वे वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 100 वे वर्ष, असा हा दुर्मिळ योग यंदा जुळून आला. या दोन्ही विषयांवर आधारित दोन भव्य चित्ररथ यात्रेत सहभागी झाले होते. या चित्ररथांच्या माध्यमातून डोंबिवलीच्या सांस्कृतिक संचितासोबतच राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेचेही दर्शन घडले. या अनोख्या संकल्पनेला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

( नक्की वाचा : गुढीपाडव्याच्या दिवशी जगभर निघणाऱ्या शोभायात्रेला सुरुवात कशी झाली? )

यंदाच्या वर्षी 'देशभक्तीची अनेक रूपं' ही संकल्पना राबवण्यात आली होती. यामध्ये 'क्रांतिकारी देशसेवक' या विषयावर आधारित वेशभूषा स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे, या स्पर्धेत 5 वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते 75 वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत सर्वांनीच मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकाला 25000 रुपये रोख, तर उपविजेत्याला 15000 रुपये आणि इतर आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे यंदाची स्वागत यात्रा केवळ धार्मिक न राहता ती राष्ट्रीयत्वाचा संदेश देणारी ठरली.

डोंबिवलीकरांचा सांस्कृतिक अभिमान

गेल्या 28 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आता डोंबिवलीची ओळख बनली आहे. श्री गणेश मंदिर संस्थानाच्या पुढाकाराने सुरू झालेली ही स्वागत यात्रा आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. यंदाच्या या सोहळ्यातून तरुण पिढीला आपल्या मुळांची ओळख करून देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com