Dombivli News: कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) क्षेत्रात अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आवाज उठवणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची अत्यंत धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात काही दिवसांपूर्वी प्रताप चौधरी यांची त्यांच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर आता मृत प्रताप चौधरी यांच्या पत्नी नेहा चौधरी यांनी थेट महापालिका प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्यामुळेच आपल्या पतीचा जीव गेला असून, महापालिकेने वेळीच कारवाई केली असती तर आपले पती आज जिवंत असते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात राहणारे प्रताप चौधरी यांची त्यांच्या राहत्या घरात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात टिळकनगर पोलिसांनी तातडीने तपास करत मुख्य आरोपी रोहित शेलार याला अटक केली आहे. मात्र, या हत्येमागे केवळ वैयक्तिक वाद नसून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात दिलेली तक्रार कारणीभूत असल्याचा नवीन अँगल आता मृताच्या पत्नीने समोर आणला आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये खळबळ! क्लस्टर योजना अडवण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळले; थेट राजकीय नेत्यांवर गुन्हा )
महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप
पतीच्या मृत्यूनंतर प्रचंड धक्क्यात असलेल्या नेहा चौधरी यांनी थेट केडीएमसीच्या कारभारावर आणि डोळेझाक करण्याच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. परिसरातील संबंधित अनधिकृत बांधकामाबाबत प्रताप चौधरी यांनी केडीएमसीकडे अधिकृतपणे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या.
या तक्रारींचा पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने आजतागायत त्या बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. महापालिकेने वेळेत दखल घेऊन ते बांधकाम पाडले असते, तर आरोपींनी हे भयंकर पाऊल उचलले नसते आणि माझे कुंकू पुसले गेले नसते, असा उद्विग्न आरोप नेहा चौधरी यांनी केला आहे.
( नक्की वाचा : डोंबिवलीत पिंपळेश्वर मंदिराच्या जागेवरून नवी ठिणगी? उदय सामंत यांच्या कानात सांगणारा 'तो' भाजपा नेता कोण? )
नेहा चौधरी यांनी केवळ महापालिकेवरच नाही तर पोलीस यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य आरोपी रोहित शेलार याला पोलिसांनी पकडले असले, तरी या संपूर्ण हत्येच्या कटात त्याला मदत करणारे आणि पाठीशी घालणारे इतरही अनेक चेहरे आहेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. केवळ एकाला पकडून तपास थांबवू नका, तर या हत्येचा कट रचणाऱ्या आणि आरोपीला मदत करणाऱ्या इतर सर्व सहआरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आरोपांनंतर पोलीस आणि केडीएमसी बॅकफूटवर
एका सामान्य नागरिकाने अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा गंभीर आरोप थेट पत्नीने केल्यामुळे आता कल्याण डोंबिवली परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या भूमाफियांची हिंमत इतकी वाढली आहे का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. या खळबळजनक आरोपांनंतर आता केडीएमसी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा स्वतःचा बचाव करण्यासाठी काय पावले उचलणार आणि त्या अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world