डोंबिवलीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते एका रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला .डोंबिवली पश्चिम येथील राजूनगर परिसरात 16 कोटी रुपयांचा निधी खर्च करून हा रस्ता केला जाणार आहे. ज्या प्रभागात हा रस्ता होणार आहे, तिथे भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या पत्नी कविता म्हात्रे या नगरसेविका होत्या. कामे होत नसल्याच्या आरोप करत विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांनी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता इथला रस्ता होत आहे. त्यामुळे एक वेगळीच चर्चा या भागात होत आहे.
चव्हाण यांच्याकडून रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ केल्यानंतर माजी नगरसेवक विकास म्हात्रे हे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना त्याच रस्त्यावर भेटले होते. यावेळी म्हात्रे यांनी परब यांना उद्देशून म्हणाले की, सात वर्षानंतर पक्षाला जाग आली. मी राजीनामा दिल्यानंतर कामाला सुरुवात झाली. यासाठी मी प्रदेशाध्यक्षांचे कौतुक करतो,असे बोलत विकास म्हात्रे यांनी हात जोडत भाजपा जिल्हाध्यक्षांना चिमटा काढला. विकास म्हात्रे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एकीकडे तयारी सुरू असताना दुसरीकडे नाराजी नाट्य देखील सुरू आहे . विविध पक्षांमध्ये इन्कमिंग आउटगोइंग देखील सुरू आहे. डोंबिवली पश्चिमेतील राजू नगर परिसरात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 16 कोटी रुपये निधीतून एका रस्त्याचे काँक्रीटीकरणच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण शुभारंभ कार्यक्रमानंतर निघून गेले. मात्र या दरम्यान त्या रस्त्यावरून जात असताना माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि भाजपाचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट झाली.
यावेळी विकास म्हात्रे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना हात जोडून नमस्कार केला. आधी कौतुक केले. मी सात वर्षापासून यासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र मी पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर कामाला सुरुवात झाली. लोकांची कामे झाली पाहिजेत. यासाठी मी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कौतुक करतो आणि आभार देखील मानतो. एकंदरीत विकास म्हात्रे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना चिमटा काढला. विकास मात्रे हे काही दिवसापासून सातत्याने आपली भूमिका मांडत होते. मात्र ज्या प्रकारे त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना बोलून दाखवले याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world