जाहिरात

Dombivli News: मनसेचा दणका, पोलिसांना जाग; तरुणीच्या खात्यात 2.60 कोटी कुठून आले? सगळं समोर येणार

Dombivli News: डोंबिवलीतील विद्यार्थिनीची फसवणूक करून तिच्या बँक खात्यातून तब्बल 2 कोटी 60 लाखांचे संशयास्पद व्यवहार केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Dombivli News: मनसेचा दणका, पोलिसांना जाग; तरुणीच्या खात्यात 2.60 कोटी कुठून आले? सगळं समोर येणार

Dombivli News: एका तरुणीची फसवणूक करून तिच्या बँक खात्याचा गुन्हेगारी कृत्यांसाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. निधी तिवारी या विद्यार्थिनीच्या नावाने उघडलेल्या विविध बँक खात्यांतून तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी रामनगर पोलिसांनी अखेर चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 काय आहे नेमकं प्रकरण?

डोंबिवलीच्या गोग्रासवाडी परिसरात राहणारी निधी तिवारी कल्याणमधील एका नामांकित महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. तिची मैत्रीण चांदनी सिंग, जी आरबीएल (RBL) बँकेत कार्यरत होती, तिने "मला खाते उघडण्याचे टार्गेट पूर्ण करायचे आहे" असे सांगून निधीचे बँक खाते उघडले. यासाठी तिने निधीला काही पैसेही दिले होते. मात्र, काही दिवसांनी निधीला धक्कादायक माहिती मिळाली. तिच्या एका खात्यातून 2 कोटी 60 लाख तर दुसऱ्या खात्यातून 10 लाख रुपयांचे व्यवहार झाले होते.

(नक्की वाचा- Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण)

उत्तराखंडमधील नागरिकांची फसवणूक

निधीने या व्यवहारांबाबत चांदनीकडे विचारणा केली असता तिने टाळाटाळ केली. अधिक तपास केला असता, उत्तराखंडमधील भोळ्याभाबड्या नागरिकांची सायबर फसवणूक करून तो पैसा निधीच्या खात्यात वळवण्यात आला होता आणि तिथून तो काढला जात होता. या रॅकेटमध्ये उल्हासनगरमधील काही व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांचा पोलिसांवर प्रहार

गेल्या 3 महिन्यांपासून निधी पोलिसांकडे दाद मागत होती, मात्र ठोस कारवाई होत नसल्याने तिने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी या प्रकरणात उडी घेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. "सायबर फसवणुकीबद्दल मुख्यमंत्री मोठ्या घोषणा करतात, मग डोंबिवलीतील एका विद्यार्थिनीची फसवणूक झाल्यावर पोलीस गप्प का? आरोपींना बोलावूनही त्यांना सोडून का दिले?" असा संतप्त सवाल त्यांनी केला.

(नक्की वाचा-  Badlapur News: बदलापूर पुन्हा हादरलं! स्कूल बसमध्ये चालकाचं विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य)

चौघांवर गुन्हा दाखल

मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर रामनगर पोलिसांनी तपास वेगाने चक्र फिरवली आणि चांदनी सिंग, चंद्रशेखर सिंग, जयेश साखला, सौरभ जाधव  आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. एका सुशिक्षित तरुणीला अशा प्रकारे जाळ्यात ओढून कोट्यवधींचे व्यवहार करणे, हे एका मोठ्या सायबर क्राईम सिंडिकेटचे लक्षण मानले जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com