मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून २९ तरुणांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक आकडेवारी पोलीस दलाने जाहीर केलेल्या आकडेवारीत समोर आली आहे. जळगाव पोलीस दलाच्या वतीने १ जानेवारी ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीतील आत्महत्या करणाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. यात लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून २९ तरुणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
एवढेच नाही तर जिल्ह्यात ६ महिन्यांत ४४३ आत्महत्या केल्याची नोंद असून यामध्ये ३८३ पुरुष, २९ महिला, ८ लहान मुले आणि ११ लहान मुलींचा समावेश आहे. तर आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण सुमारे ९० टक्के आहे. तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी १२ गुन्हे दाखल केले आहेत.
लग्न जमत नसल्याने २९ जणांची आत्महत्या...
पुरुषांच्या आत्महत्येमागील प्रमुख कारणांमध्ये दारूचे व्यसन ९०, नैराश्य ७४, कौटुंबिक कलह ६१, कर्जबाजारीपणा ५२ आणि गंभीर आजार ४४ अशी कारणे समोर आली आहेत. मात्र, लग्न जमत नसल्याने २९ जणांनी आत्महत्या केल्याची बाब विशेष चिंतेची ठरत आहे. सामाजिक अपेक्षा, आर्थिक अडचणी, वाढते वय आणि वारंवार येणारे नकार. या सगळ्यांचा मानसिक परिणाम अनेक तरुणांवर होत असल्याचं या आकडेवारीतून समोर येत आहे. महिलांच्या आत्महत्यांमध्ये कौटुंबिक वाद आणि नैराश्य ही प्रमुख कारणे आहेत. तर लहान मुलं आणि मुलींमध्ये कौटुंबिक तणाव, परीक्षेचे दडपण आणि प्रेमप्रकरणं ही कारणे समोर आली आहेत. यामुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न प्रत्येक वयोगटासाठी गंभीर बनत असल्याचे दिसून येत आहे.
तणावग्रस्त तरुणांना समुपदेशनाची गरज...
जळगाव जिल्ह्यातील ही आकडेवारी केवळ पोलिसांच्या नोंदी नसून समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. विवाह हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला, तरी तो व्यक्तीच्या आयुष्याचे मूल्य ठरवणारा निकष ठरू नये अशी भावना व्यक्त होत आहे. विवाहाबाबतचा सामाजिक दबाव कमी करणे, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि तणावग्रस्त तरुणांना वेळेत समुपदेशन तसेच भावनिक आधार देणे, ही काळाची गरज बनली आहे.
जिल्हा पोलिसांनी आत्महत्यांच्या कारणांचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण सार्वजनिक केले आहे. या आकडेवारीतून समाजाने या प्रश्नाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मनोविकारतज्ज्ञांच्या मते, मानसिक तणावात असलेल्या व्यक्तीशी कुटुंबीयांनी मोकळेपणाने संवाद साधणे, त्याला भावनिक आधार देणे आणि गरज भासल्यास वेळेत समुपदेशन व उपचार उपलब्ध करून देणे, हे आत्महत्या रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world