कारवाई कोणावर होणार? डोंबिवलीकरांचा रस्त्यांवरील कामावरून संतप्त सवाल

डोंंबिवलीमधील रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याचं काम करून पुन्हा निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवत रस्त्याचे खोदकाम सुरू आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

एमएमआरडीएने डाेंबिवलीतील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्ते विकासाकरिता कोट्यवधीचा निधी दिला. रस्त्याचे काम सुरू झाले. काम संपल्यावर रस्त्याला लगेचच तडे पडण्यास सुरूवात झाली. या कामासाठी कोणत्या प्रकारची सामग्री वापरली गेली असेल. याचा अंदाज येतो. आता नागरिकांनी बोंबाबोंब केल्यानंतर रस्ता खोदून पुन्हा तयार केला जात आहे. त्यासाठीही वापरले जाणारे साहित्य तेच, असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.  आता या प्रकरणी संतापलेले पाटील यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. यासाठी जबाबदार कोण? त्या जबाबदार व्यक्तीच्या विरोधात कारवाई होणार का? 'पुछता है डोंबिवलीकर'  म्हणत ट्वीट केलं आहे. 

कल्याण डोंबिवलीमधील डांबरी रस्ते सिमेंटचे करण्याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून जवळपास 470 काेटींचा निधी मंजूर केला होता. या मंजूर निधीतून एमएमआरडीएने निविदा काढून ही कामे कंत्राटदाराच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली. ठिकठिकाणी सिमेंट रस्त्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. डोंबिवली जिमखानासमोरचा रस्ता हा सिमेंटचा तयार करण्यात आला. सिमेंटचा रस्ता तयार झाल्यावर त्याच रस्त्याला तडे गेले आहे. या रस्त्याला तडे गेल्याने हे काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. याप्रकरणी नागरीकांनी तक्रारी केल्या.

नक्की वाचा - लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता 'या' महीलांनाही मिळणार लाभ

रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याने हा रस्ता पुन्हा खोदण्यात आला. त्या रस्त्याचे काम पुन्हा नव्याने करण्यात येत आहे. रस्त्याचं काम पुन्हा केले जात असले तरी त्या कामातही वापरले जाणारे साहित्य सामग्री ही निकृष्ट दर्जाची आहे, याकडेही पुन्हा नागरिकांनी लक्ष वेधलं आहे. या सगळया प्रकाराची दखल घेत मनसे आमदार पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना ट्वीट केले आहे.

Advertisement

राजू पाटील यांनी केलेल्या ट्वीटनुसार, डोंंबिवलीमधील रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याचं काम करून पुन्हा निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवत रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. नुकताच एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीच्या जिमखाना परिसरात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम करण्यात आले होते. मात्र आता निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवून पुन्हा रस्ता खोदण्याचे काम सुरू आहे. डोंबिवलीकरांकरीता मंजूर असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या  निधीचा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चुराडा होत असल्याने याला काेण जबाबदार हे डोंबिवलीकर विचारणार ना?